आपच्या आमदाराला तुरुंगवासाची शिक्षा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था ।  आपचे आमदार सोमनाथ भारती  यांची दिल्लीतील राऊज एव्हेन्यू कोर्टाने  2 वर्षांचा तुरुंगवास आणि 1 लाख रुपये दंडाची शिक्षा कायम ठेवलीय. 

 

दिल्लीतील AIIMS रुग्णालयातील सुरक्षा रक्षकाला मारहाण आणि सार्वजनिक संपत्तीचं नुकसानीसह त्यांच्यावर गंभीर आरोप होते.

 

सोमनाथ भारती यांनी 2 वर्षांच्या तुरुंगवासाच्या शिक्षेला दिल्ली उच्च न्यायालयात आव्हान दिलंय. त्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करत आपल्याला खोट्या प्रकरणात फसवल्याचा दावा करत ही शिक्षा रद्द करण्याची मागणी केलीय. याआधी त्यांनी कनिष्ठ न्यायालयाच्या निर्णयाला एव्हेन्यू कोर्टात आव्हान दिलं होतं. मात्र,  न्यायालयाने निकाल सुनावत 23 मार्च रोजी शिक्षा कायम ठेवली. आता त्यांनी दिल्ली उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे.

 

 

याआधी सोमनाथ भारती यांना तुरुंगवासाची शिक्षा सुनावल्यानंतर त्यांची रवानगी थेट तिहार जेलमध्ये झाली होती. आता उच्च न्यायालयानेही त्यांची शिक्षा कायम ठेवल्यास त्यांची आमदारकीही जाऊ शकते. पुढील 6 वर्षे त्यांना निवडणूक लढण्यासही बंदी घातली जाऊ शकते.

 

. सोमनाथ भारती यांच्यावर 2016 मध्ये एम्स रुग्णालयातील सुरक्षा रक्षकाला मारहाण केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी 23 जानेवारी रोजी त्यांना दोषी ठरवण्यात आले आणि 2 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली.

 

सोमनाथ भारतींवर दंगल करणे, बेकायदेशीरपणे लोकांना जमवणे आणि प्रिव्हेंशन ऑफ डॅमेज टू पब्लिक प्रॉपर्टी कायद्यानुसार सार्वजनिक संपत्तीचं नुकसान करणे असे गंभीर आरोप आहेत. या आरोपांमध्ये कनिष्ठ न्यायालयाने भारती यांना दोषी ठरवलं आहे.

Protected Content