शरद पवारांकडून अनिल देशमुखांची प्रशंसा

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी योग्य पद्धतीने  सचिन वाझे यांच्या विरोधातील गुन्ह्याच्या मुद्द्यावर   जबाबदारी पार पाडली आहे आणि जे दोषी आहेत त्यांना सगळ्यांसमोर आणलं”, असं म्हणत शरद पवार यांनी  अनिल देशमुखांचं कौतुक केलं.

 

राज्यात सध्या चर्चा आहे ती निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे प्रकरणाची. या प्रकरणावरून राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख आणि मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना विरोधी पक्षाने टार्गेट केलं असताना आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी या संपूर्ण प्रकणावर आपली भूमिका मांडली आहे. सोमवारी शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामध्ये तब्बल तासभर चर्चा झाली. त्यानंतर शरद पवार थेट वाय. बी. चव्हाण सेंटरवर राष्ट्रवादीच्या बैठकीसाठी गेल्यामुळे या मुद्द्यावरचं गूढ अधिकच वाढलं. आज दिल्लीमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये शरद पवारांना या मुद्द्यावर प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी त्यांची भूमिका मांडली आहे.

 

राज्यातलं महाविकास आघाडी सरकार अडचणीत आलं आहे का? असा प्रश्न विचारल्यावर पवार म्हणाले, “महाविकास आघाडी सरकारमध्ये काहीही अडचण नाही. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात सर्व सहकारी व्यवस्थित काम करत आहेत. काही समस्या येतात, त्या सोडवल्या जातील.” दरम्यान, सचिन वाझे प्रकरणावरून विरोधी पक्ष टार्गेट करत असताना तो मुद्दा शरद पवारांनी फेटाळून लावला. “एका सब इन्स्पेक्टरचा परिणाम संपूर्ण सरकारवर होईल असं मला वाटत नाही. या प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणा तपास करत असतील तर आपलं कर्तव्य आहे की त्यांना सहकार्य करणं आणि ज्या लोकांनी आपल्या अधिकारांचा गैरवापर केला आहे, त्यांना त्यांची जागा दाखवण्यासाठी या राष्ट्रीय तपास यंत्रणा काम करत आहेत”, असं ते म्हणाले.

 

दरम्यान, मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना पदावरून हटवणार असल्याच्या चर्चेवर शरद पवारांनी भूमिका स्पष्ट केली. “परमबीर सिंग यांना पदावरून हटवणार की नाही, हा प्रश्न तुम्ही मुख्यमंत्र्यांना विचारायला हवा”, असं ते म्हणाले.

Protected Content