विरोधकांचा राज्यसभा कामकाजावर बहिष्कार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । राज्यसभेच्या विरोधी पक्षाच्या आठ खासदारांचं निलंबन रद्द करावं, अशी मागणी विरोधकांकडून करण्यात आलीय. राज्यसभा खासदारांनी सोमवारपासून संसद परिसरातील महात्मा गांधीजींच्या पुतळ्यासमोर सुरु केलेलं आपलं धरणं आंदोलन संपुष्टात आणलंय. परंतु, निलंबन रद्द होईपर्यंत राज्यसभेच्या कामकाजावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय विरोधी पक्षानं घेतलाय.

कारवाई करण्यात आलेल्या आठ खासदारांचं निलंबन रद्द होईपर्यंत विरोधी पक्षाकडून सदनाच्या कामकाजावर बहिष्कार टाकण्यात येत असल्याचं राज्यसभेतील विरोधी पक्षाचे नेते गुलाम नबी आझाद यांनी म्हटलंय.

सर्वच विरोधी पक्षांनी सदनाच्या उरलेल्या सत्राचा बहिष्कार केल्याचं काँग्रेसचे राज्यसभा खासदार सय्यद नासिर हुसैन यांन म्हटलंय. धरणं आंदोलन रद्द करण्यात येत असलं तरी खासदारांचं निलंबन रद्द होईपर्यंत कामकाजावर बहिष्कार कायम राहील, असंही त्यांनी स्पष्ट केलंय.

कृषि विषयक विधेयकांवर सदनात मतदान व्हायला हवं होतं, परंतु असं काहीही घडलेलं नाही कारण सभापती कुणाचं म्हणणं ऐकून घेण्यास तयार नाहीत, असा आक्षेपही विरोधकांकडून व्यक्त करण्यात आला. रविवारी कृषि विधेयकावर सदनात गोंधळ सुरू असतानाच उपसभापतींनी आवाजी मतदानाद्वारे दोन्ही कृषि विषयक विधेयके संमत करून घेतली होती.

Protected Content