महाराष्ट्रातील भारत राष्ट्र समिती पक्षाचे एकमेव कार्यालय बंद

नागपूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | महाराष्ट्राच्या राजकारणात मोठया थाटात भारत राष्ट्र समितीने (बीआरएस) प्रवेश केला होता. पण आता महाराष्ट्रामधील त्यांचे कामकाज थांबवल्याचे दिसून येत आहे. हा पक्ष महाराष्ट्रात आगामी लोकसभा निवडणुकीत उतरणार किंवा नाही याची कोणतेही माहिती मिळालेली नाही आहे.

तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या नेतृत्वातील भारत राष्ट्र समितीने जोरदार प्रवेश केला होता, पण तेलंगणातील विधानसभा निवडणूकीत काँग्रेसकडून पराभव झाल्यामुळे महाराष्ट्रातील त्यांचे राजकारण थंडावले. त्यातच आता बीआरएसचे राज्यातील नागपूरमध्ये एकमेव कार्यालय होते ते कार्यालय आता बंद करण्यात आले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील बीआरएस पक्षाच्या नेत्याची घोर निराशा झाली आहे.

यासंदर्भात बीआरएसचे विदर्भातील नेते चरण वाघमारे म्हणाले की, बीआरएसचे तेलंगणातील सरकार कोसळले. त्याचा पक्षाच्या महाराष्ट्रातील कामकाजावर कोणताही परिणाम पडणार नाही अशी आम्हाला अपेक्षा होती. पण आता पक्षाचे महाराष्ट्रातील कामकाज थांबले आहे. महाराष्ट्रातील पक्षाच्या वाटचालीविषयी आम्हाला नेतृत्वाकडून अद्याप कोणतेही निर्देश मिळाले नाहीत. त्यांनी पक्षाच्या नागपूर कार्यालयाच्या चाव्या जमा करण्यास सांगितले आहे. थोडक्यात सांगायचे तर महाराष्ट्रातील बीआरएसचे काम थांबले आहे बंद झाले आहे .

बीआरएसचे मराठवाड्यातील नेते शंकरअण्णा धोंडगे यांनीही  पक्षनेतृत्वाकडून कोणतेही आदेश प्राप्त झाले नसल्याचे म्हटले आहे. तेलंगणा विधानसभा निवडणुकीचा निकाल व केसीआर यांच्या झालेल्या अपघातानंतर बऱ्याच घडामोडी घडल्या आहेत. लोकसभा निवडणुकीविषयी पक्षाकडून अजून कोणतेही आदेश प्राप्त झाले नाहीत.

Protected Content