पीक विम्याबाबत अधिकाऱ्यांची मनमानी चालू देणार नाही : भाजपचा इशारा

4Uday 20Wagh 20BJP 0

अमळनेर (वृत्तसंस्था) महसूल आणि कृषी विभागाच्या मस्तवाल अधिकाऱ्यांनी विमा कंपनीशी संगनमत केल्याने तालुक्यात दुष्काळ असूनही शेतकऱ्यांना पीक विमा मंजूर झाला नसल्याने अधिकाऱ्यांची मनमानी कारभार चालू देणार नाही. शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी मंत्र्यांना साकडे घालणार असल्याचा इशारा भाजपचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे.

 

गेल्यावर्षी अमळनेर तालुका दुष्काळी जाहीर झाला नसतानाही शेतकऱ्यांना प्रतिहेक्टर पाच ते २४ हजार रुपयांपर्यंत सुमारे ४४ कोटी विमा मंजूर झाला होता. यंदा तालुक्यात ५० टक्के पेक्षा पाऊस कमी झाल्याने तालुका दुष्काळी जाहीर झाला आहे. यंदा एकूण १३ हजार ७८० शेतकऱ्यांच्या १५ हजार ५४५ हेक्टर क्षेत्राचा कापूस पीक विमा काढला आहे, तरीही निव्वळ अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे आणि घरी बसून कागद रंगवण्याच्या प्रवृत्तीमुळे शिरूड व्यतिरिक्त कुठल्याही मंडळात पीक विमा मंजूर झालेला नाही. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या निर्लज्जपणाचा कळस म्हणजे गडखाम्ब क्षेत्रात बागायती उत्पन्न पाच क्विंटल दाखवण्यात आले तर कोरडवाहू उत्पन्न १० क्विंटल दाखवण्यात आले आहे. दुष्काळी अनुदान देताना अधिकारी फक्त जिरायती शेती दाखवतात तर पीक विमा पंचनामा करताना बागायती व जिरायती असे प्रकार केले जातात, १५ दिवसाचा खंड असेल तरी पीक विमा मंजूर करता येतो, असे असताना तालुक्यात पावसाचा दीड महिन्याचा खंड पडला आहे.

त्याचप्रमाणे प्रत्येक मंडळात स्वतंत्र बागायती व जिरायती पंचनामे करणे आवश्यक असताना अधिकाऱ्यांनी भरवस मंडळात फक्त बागायती पंचनामे केले आहेत. वावडे मंडळात फक्त जिरायती पंचनामे करून दोघांची सरासरी केली, त्यामुळे सदोष पंचनामे झाले आहेत आणि शेतकऱ्यांना अक्षरशः वाऱ्यावर सोडण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी ओरड करूनही अधिकारी लक्ष देत नाहीत, संबंधित अधिकाऱ्यांच्या कानावर ही बाब टाकूनही दुर्लक्ष केले जात आहे. तसेच वावडे भागात गटांचे उत्पन्न कमी असतानाही पंचनाम्यात जास्त दाखवण्यात आल्याची लेखी कबुली वावडे मंडलाधिकारी आर.पी. शिंदे यांनी दिली आहे. याचा अर्थ महसूलचे अधिकारी व कृषी अधिकाऱ्यांनी विमा कंपनीशी तडजोड केली आहे, हे स्पष्ट होते. त्यामुळे दुष्काळात होरपळणाऱ्या शेतकऱ्यांच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा प्रकार अजिबात सहन करणार नाही. याबाबत महसूलमंत्री चंद्रकांत पाटील व जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांना साकडे घालून अधिकाऱ्यांवर कारवाई करून शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत शांत बसणार नाही, असा इशारा उदय वाघ यांनी दिला आहे.

Add Comment

Protected Content