
रावेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू झाले असून रावेर तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांच्या आशा आता नव्याने निवडून आलेले आमदार नंदकिशोर महाजन यांच्यावर केंद्रित झाल्या आहेत. निसर्गाच्या सततच्या बदलत्या चक्रामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या समस्या आणि नुकसानाची व्यथा आता थेट विधिमंडळाच्या सभागृहात मांडली जाईल, अशी अपेक्षा शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे.

रावेर तालुका हा राज्यातील प्रमुख केळी उत्पादक भाग म्हणून ओळखला जातो. मात्र गेल्या काही वर्षांपासून अस्मानी आणि सुलतानी संकटांमुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडले आहे. यंदाही पावसातील अनियमितता, विहिरींच्या खालावलेल्या पाणीपातळीमुळे शेतीसमोर गंभीर आव्हाने निर्माण झाली आहेत. त्यामुळे शेतकरी शासनाकडून ठोस मदत आणि दीर्घकालीन उपाययोजनांची अपेक्षा करत आहेत. आमदार नंदकिशोर महाजन हे रावेर तालुक्यातील स्थानिक नेतृत्व म्हणून ओळखले जातात. त्यांनी आपल्या राजकीय प्रवासाची सुरुवात गावच्या सरपंचपदापासून केली असून पंचायत समिती सदस्य, सभापती, जिल्हा परिषद सदस्य, जिल्हा परिषद उपाध्यक्ष आणि जिल्हा बँकेचे संचालक अशा विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. ग्रामीण भागातील प्रश्नांशी त्यांचा जवळचा संबंध राहिला असून केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी, उत्पादन खर्च, बाजारभावातील चढ-उतार आणि नैसर्गिक आपत्तींचे परिणाम याची त्यांना चांगली जाण आहे.
दि. ४ जून रोजी झालेल्या वादळी पावसामुळे रावेर तालुक्यातील २ हजार ८५ शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. बाजारभावाच्या अंदाजानुसार या नुकसानीचा आकडा तब्बल ७०० कोटी रुपयांपेक्षा अधिक असल्याचे सांगितले जात आहे. अनेक शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला असून वर्षभर केलेली मेहनत काही क्षणांत उद्ध्वस्त झाली आहे. या संकटाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांची अपेक्षा केवळ आर्थिक मदतीपुरती मर्यादित राहिलेली नाही. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी, पीक नुकसानीचे योग्य पंचनामे व्हावेत, शासनाने प्रभावी निर्णय घ्यावेत आणि शेतीला स्थैर्य मिळावे, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
रावेर तालुक्यातील नागरिकांना विश्वास आहे की, ग्रामीण भागातून पुढे आलेले आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाणीव असलेले आमदार नंदकिशोर महाजन हे आगामी अधिवेशनात केळी उत्पादक शेतकऱ्यांचा आवाज प्रभावीपणे मांडतील. त्यामुळे या अधिवेशनाकडे रावेर तालुक्यातील शेतकरी मोठ्या अपेक्षेने पाहत आहेत.



