Home धर्म-समाज आषाढी एकादशी: पंढरपूर यात्रेसाठी मुक्ताईनगर आगाराची विशेष बस सेवा; महिलांना ५०% सवलत,...

आषाढी एकादशी: पंढरपूर यात्रेसाठी मुक्ताईनगर आगाराची विशेष बस सेवा; महिलांना ५०% सवलत, तर ज्येष्ठांना मोफत प्रवास!

0
10


मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । आषाढी एकादशीच्या पावन पर्वावर पंढरीच्या विठुरायाच्या दर्शनासाठी आसुसलेल्या वारकरी आणि भाविकांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. २५ जुलै रोजी होणाऱ्या श्रीक्षेत्र पंढरपूर यात्रेसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या मुक्ताईनगर आगारामार्फत विशेष जादा बस सेवा आणि ग्रुप बुकिंगची सुवर्णसंधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. यंदाची आषाढी वारी भाविकांना अधिक सुखकर आणि आनंददायी करता यावी, यासाठी एसटी महामंडळाने कंबर कसली असून प्रवाशांच्या सोयीसाठी विशेष नियोजन केले आहे.

या संदर्भातील सविस्तर वृत्त असे की, मुक्ताईनगर आगाराने दरवर्षीप्रमाणे यंदाही पंढरपूर यात्रेसाठी कडेकोट नियोजन केले आहे. भाविकांना सुरक्षित, आरामदायी आणि अत्यंत किफायतशीर प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्याचा आगार प्रशासनाचा मानस आहे. विशेष म्हणजे, शासनाच्या नियमानुसार महिला प्रवाशांसाठी तिकीट दरात तब्बल ५० टक्के सवलत लागू असणार आहे. तसेच, ७५ वर्षांवरील अमृत ज्येष्ठ नागरिकांना संपूर्ण मोफत प्रवासाचा लाभ घेता येणार आहे. या सवलतींमुळे महिला आणि ज्येष्ठ भाविकांमध्ये वारीला जाण्यासाठी मोठा उत्साह पाहायला मिळत आहे.

भाविकांच्या सुविधेसाठी मुक्ताईनगर आगाराने एक खास योजना देखील आणली आहे. जर एखाद्या गावातील अथवा मंडळातील ४४ किंवा त्यापेक्षा अधिक प्रवासी एकत्र आले, तर थेट त्या गावातून थेट पंढरपूरपर्यंत विशेष बस उपलब्ध करून दिली जाणार आहे. या थेट ग्रुप बुकिंगच्या सुविधेमुळे भाविकांना बस स्थानकावर येण्याची गरज पडणार नाही, तसेच त्यांना आपल्या घरूनच थेट विठ्ठलाच्या दराबापर्यंत प्रवास करता येणार आहे. आषाढी पालखी सोहळ्याचा दिव्य आनंद घेण्यासाठी भाविकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

या विशेष बस सेवेचा लाभ घेण्यासाठी तसेच आगाऊ बुकिंग व अधिक माहितीसाठी भाविकांनी मुक्ताईनगर बस स्थानक (०२५८३-२३४२२५) किंवा आगार व्यवस्थापक श्री. निलेश कलाल (८८८८१ ८७६४८), स्थानक प्रमुख श्री. अनिल बावस्कर (९६३७० ७२२३१), वाहतूक अधीक्षक श्री. अभिषेक इंगळे (९०२१४९९६८६) आणि सहायक वाहतूक निरीक्षक श्री. दीपक चौधरी (८१४९६ १२६३७) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. “रा.प. मुक्ताईनगर आगार भाविकांच्या सेवेस सदैव तत्पर असून, जास्तीत जास्त वारकरी व भाविक भक्तांनी या विशेष बस सेवेचा लाभ घ्यावा,” अशी विनंती मुक्ताईनगर आगार प्रशासनाच्या वतीने करण्यात आली आहे.


Protected Content

Play sound