Home Cities जळगाव सुधर्मा संस्थेतर्फे कचरावेचक महिलांना दिवाळीची भेट; अर्चना बारी, शिवाजी गायकवाड यांचा गौरव

सुधर्मा संस्थेतर्फे कचरावेचक महिलांना दिवाळीची भेट; अर्चना बारी, शिवाजी गायकवाड यांचा गौरव

0
1

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । दिवाळीचा खरा आनंद हा समाजातील वंचित आणि गरजू घटकांपर्यंत पोहोचवण्यातच असतो, या सामाजिक भावनेतून सुधर्मा सामाजिक संस्थेतर्फे एक स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला. जळगाव शहरातील तांबापुरा, मेहरूण, हुडको आणि खेडी परिसरातील २५ कचरावेचक महिलांना दिवाळीनिमित्त किराणा साहित्य व फराळाचे वाटप करून त्यांच्या कुटुंबात सणाचा आनंद द्विगुणित करण्यात आला.
या विशेष उपक्रमांतर्गत महिलांना सणासाठी आवश्यक असणारे तेल, बेसन, तूरडाळ, मूगडाळ, चहापत्ती, शेंगदाणे यांसारखे संपूर्ण किराणा साहित्य तसेच गोड मिठाई आणि चिवड्याचे वाटप करण्यात आले. कष्टकरी महिलांच्या कुटुंबालाही दिवाळीचा सण आनंदाने आणि उत्साहाने साजरा करता यावा, हाच या उपक्रमामागील मुख्य उद्देश होता.
याच सोहळ्यात समाजासाठी निःस्वार्थ भावनेने कार्य करणाऱ्या दोन व्यक्तींचा विशेष सन्मान करण्यात आला. सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या अर्चना विनोद बारी आणि बेवारस नवजात बालकाचे प्राण वाचवणारे शिवाजी गायकवाड यांना शाल, पुष्पगुच्छ आणि भगवद्गीतेची प्रत सप्रेम भेट देऊन गौरविण्यात आले.
आपल्या सत्कारानंतर भावना व्यक्त करताना अर्चना बारी यांनी सुधर्मा संस्थेचे अध्यक्ष हेमंत बेलसरे यांनी त्यांच्या शिक्षणासाठी, सायकलसाठी तसेच नोकरी मिळवून देण्यासाठी वेळोवेळी केलेल्या मदतीची आठवण काढत कृतज्ञता व्यक्त केली. तर दुसरीकडे बेवारस अवस्थेत आढळलेल्या नवजात बालकाचे प्राण वाचवून त्याला पोलिसांच्या व रुग्णालयाच्या स्वाधीन करणाऱ्या शिवाजी गायकवाड यांच्या माणुसकीच्या कार्याचे उपस्थित मान्यवरांनी विशेष कौतुक केले.
सुधर्मा सामाजिक संस्था गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक बांधिलकी जपत विविध सामाजिक उपक्रम राबवत आहे. गरजू व्यक्तींच्या चेहऱ्यावर आनंद फुलविणे आणि निःस्वार्थ भावनेने समाजसेवा करणाऱ्या व्यक्तींना प्रोत्साहन देणे हाच संस्थेचा मुख्य उद्देश असल्याचे अध्यक्ष हेमंत बेलसरे यांनी सांगितले. या कार्यक्रमाला संस्थापक अध्यक्ष हेमंत बेलसरे, सचिव दिनकर बाविस्कर, नानाभाऊ चव्हाण, नितीन तायडे, भाग्यश्री नन्नवरे, सुवर्णा मराठे, विजया मराठे, सुनीता बेलसरे आणि सूर्यकांत हिवरकर यांच्यासह अनेक पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.


Protected Content

Play sound