भडगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । सद्यस्थितीतील तीव्र दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी आणि शासनाच्या विविध सेवा-सुविधा शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी पत्रकारांनी सजग राहून कार्य करावे, असे आवाहन आबासो दत्ता पवार नागरी पतसंस्थेचे चेअरमन तथा भडगावचे माजी नगराध्यक्ष प्रशांत दत्तात्रय पवार यांनी केले. दीपावलीच्या पावन पर्वावर आयोजित भडगाव शहर व तालुक्यातील पत्रकार बांधवांच्या स्नेहसंवाद कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
दिवाळीच्या मंगलमय शुभेच्छा देताना प्रशांत पवार यांनी तालुक्यातील दुष्काळी स्थितीचा सविस्तर आढावा घेतला. ते म्हणाले की, सर्वसामान्य जनता, शेतकरी व कष्टकऱ्यांना शासनाच्या आवश्यक योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रशासनासोबतच प्रसारमाध्यमांचे सहकार्य अत्यंत मोलाचे आहे. दुष्काळाच्या तीव्र झळा कमी करण्यासाठी पाणीपुरवठा, शासकीय मदत व उपाययोजनांची अचूक माहिती वेळेवर नागरिकांपर्यंत पोहोचवणे गरजेचे आहे. यासाठी पत्रकार बांधवांनी जनजागृतीपर संदेश तळागाळातील घटकांपर्यंत पोहोचवावा.
या दिपावली स्नेह मिलन सोहळ्यात भडगाव तालुक्यातील पत्रकार बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून परस्पर संवाद साधला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार संजय पवार यांनी केले. याप्रसंगी भडगाव पिपल्स बँक चेअरमन दत्तात्रय माणिकराव पवार, प्रशांत पवार, प्रवीण दत्तात्रय पवार यांच्यासह पवार परिवारातर्फे सर्व पत्रकार बांधव व तालुक्यातील नागरिकांना दीपावलीच्या मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या.



