
भुसावळ-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । बदलते हवामान, वाढते तापमान आणि पर्यावरणीय समस्यांच्या पार्श्वभूमीवर दावत-ए-इस्लामीच्या सामाजिक विभाग GNRF (गरीब नवाज रिलीफ फाउंडेशन) तर्फे संपूर्ण भारतात राबविण्यात येत असलेल्या ‘Save Nature’ मोहिमेअंतर्गत भुसावळ शहरात पर्यावरण जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना पर्यावरण संरक्षण, वृक्षारोपण आणि हरित वातावरणाचे महत्त्व पटवून देण्यात आले.

या मोहिमेअंतर्गत भुसावळ येथील बी.जे.झेड. उर्दू हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज, एम.आय. तेली इंग्लिश स्कूल आणि अल-हिरा उर्दू हायस्कूल येथे विशेष जनजागृती कार्यक्रम घेण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धनासाठी सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन करण्यात आले. कार्यक्रमात मार्गदर्शन करताना वक्त्यांनी सांगितले की, झाडे ही केवळ पर्यावरणाचा समतोल राखण्याचे काम करत नाहीत, तर वाढत्या तापमानावर नियंत्रण ठेवणे, शुद्ध हवा उपलब्ध करून देणे आणि नैसर्गिक साधनसंपत्तीचे संरक्षण करणे यामध्ये त्यांची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने किमान एक झाड लावून त्याचे संगोपन करण्याचा संकल्प करावा, असे आवाहन करण्यात आले. विद्यार्थ्यांना वृक्षारोपणाचे महत्त्व समजावून सांगताना भावी पिढ्यांसाठी स्वच्छ, निरोगी आणि हिरवेगार वातावरण निर्माण करणे ही प्रत्येकाची जबाबदारी असल्याचे सांगण्यात आले. पर्यावरणाचे रक्षण करणे ही केवळ सामाजिक नव्हे तर नैतिक जबाबदारी असल्याचा संदेश यावेळी देण्यात आला.
या जनजागृती अभियानाच्या यशस्वी आयोजनासाठी दावत-ए-इस्लामीच्या शिक्षण विभागाचे मौलाना अब्दुल बारी साहेब इंजिनिअर (नाशिक), मौलाना अहमद रजा साहेब (नागपूर), दावत-ए-इस्लामी जळगाव जिल्हाध्यक्ष जुबेर अत्तारी, भुसावळ शहराध्यक्ष शोएब अत्तारी, साबिर मनिहार, अजहर कादरी तसेच GNRF जळगाव जिल्हाध्यक्ष रफीक रोशन कादरी यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांना ‘सेव्ह नेचर’ मोहिमेत सहभागी होऊन पर्यावरण संरक्षणासाठी योगदान देण्याचे आवाहन करण्यात आले. GNRF तर्फे भविष्यातही शैक्षणिक संस्था आणि सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारचे पर्यावरण जनजागृती उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.



