सावदा–लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । रावेर तालुक्यातील सातपुडा जंगल सफारी, पाल येथे वर्धापन दिनानिमित्त पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत रोटरी क्लब सातपुडा व्हॅली, फैजपूर आणि रामराज्य सेवाभावी संस्था, फैजपूर यांच्या संयुक्त विद्यमाने अनोख्या पद्धतीने मैत्री दिन साजरा करण्यात आला. वृक्षारोपण, निसर्गपूजन आणि २०० भारतीय वृक्षांची लागवड अशा विविध उपक्रमांमुळे कार्यक्रमाला सामाजिक आणि पर्यावरणीय महत्त्व प्राप्त झाले.
दि. २ ऑगस्ट रोजी आयोजित या कार्यक्रमाला सातपुडा जंगल सफारीचे अधिकारी, कर्मचारी, विविध संस्थांचे पदाधिकारी तसेच मोठ्या संख्येने पर्यटक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रोटरी क्लब सातपुडा व्हॅलीचे अध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष पांडुरंग सराफ होते. यावेळी त्यांच्या हस्ते परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. आपल्या अध्यक्षीय भाषणात पांडुरंग सराफ यांनी प्रत्येकाने किमान एक झाड लावून त्याचे अपत्याप्रमाणे संगोपन करावे, असे आवाहन केले. नैसर्गिक संपत्तीचे जतन आणि संवर्धन केल्यास भावी पिढ्यांना त्याचा निश्चित लाभ होईल, असे मत त्यांनी व्यक्त केले. पर्यावरण संरक्षणासाठी प्रत्येक नागरिकाने सक्रिय सहभाग घेणे ही काळाची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले. कार्यक्रमात निसर्गदेवीचे विधिवत पूजन करण्यात आले. त्यानंतर श्रीफळ फोडून आणि केक कापून सातपुडा जंगल सफारीचा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी रोटरी क्लब, रामराज्य सेवाभावी संस्था आणि सातपुडा जंगल सफारी प्रशासनाच्या सहकार्याने परिसरात २०० भारतीय वृक्षांची लागवड करण्यात आली. या उपक्रमातून पर्यावरण संवर्धनाचा प्रभावी संदेश देण्यात आला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. राजेंद्रसिंह राजपूत यांनी केले, तर वनरक्षक राजू बोंडल यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाला वनरक्षक आकाश बारेला, वनरक्षक रियाज तडवी, रोटरी क्लबचे सचिव श्रीकांत भुयार, कोषाध्यक्ष निलेश चौधरी, रामराज्य सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष संजय सराफ, सचिव राजाभाऊ चौधरी, वनमजूर राजू तडवी, वनमजूर कय्युम तडवी, सफारी गाईड, सफारी चालक तसेच मोठ्या संख्येने पर्यटक उपस्थित होते.



