Home Cities जळगाव जळगावात ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ची सक्ती; पाणी बचतीसाठी २० टक्के कपातीचे लक्ष्य, उपमहापौर...

जळगावात ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ची सक्ती; पाणी बचतीसाठी २० टक्के कपातीचे लक्ष्य, उपमहापौर मनोज चौधरी यांचे प्रशासनाला निर्देश

0
24


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । शहरातील भविष्यातील पाणीटंचाईचा धोका लक्षात घेता पाण्याचे नियोजन आणि संवर्धनासाठी महानगरपालिका प्रशासनाने आतापासूनच प्रभावी उपाययोजना राबवाव्यात, अशा स्पष्ट सूचना उपमहापौर मनोज चौधरी यांनी दिल्या आहेत. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वाघूर धरणात सध्या सुमारे ६२ टक्के पाणीसाठा उपलब्ध असून हा साठा अंदाजे पुढील सात महिने पुरेल एवढाच आहे. त्यामुळे आगामी संकट टाळण्यासाठी आतापासूनच पाणी बचत, पाण्याचा पुनर्वापर आणि पावसाचे पाणी संधारणावर (रेन वॉटर हार्वेस्टिंग) विशेष भर देण्याचे आवाहन मनपा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

उपमहापौर मनोज चौधरी यांनी विशेषतः रेन वॉटर हार्वेस्टिंग अर्थात पावसाचे पाणी संधारण धोरणाची शहरात कठोर अंमलबजावणी करण्यावर भर दिला आहे. शहरातील मोठे बांधकाम प्रकल्प, व्यापारी संकुले, गृहसंकुले, शासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालये तसेच औद्योगिक आस्थापनांमध्ये पावसाचे पाणी साठवण आणि भूजल पुनर्भरणाची व्यवस्था प्रभावीपणे कार्यान्वित करण्यात यावी, असे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले आहेत. असे न करणाऱ्या गृहप्रकल्प व संकुलांवर नियमानुसार कारवाई करण्याचे संकेतही त्यांनी दिले आहेत.

जळगाव शहरासाठी वाघूर धरण हा प्रमुख जलस्रोत असून, त्यासोबत पूरक जलस्रोत म्हणून ४३ विहिरी आणि ६० बोअरवेल सध्या कार्यरत आहेत. मात्र वाढती लोकसंख्या आणि भविष्यातील पाण्याची निकड लक्षात घेता उपलब्ध जलस्रोतांचे योग्य व्यवस्थापन करणे अत्यंत आवश्यक बनले आहे. दरवर्षी पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतो, परंतु हे पाणी नाल्यांमधून वाहून जाते. हेच पाणी जमिनीत मुरवून भूजल पातळी वाढविण्यासाठी रेन वॉटर हार्वेस्टिंग हाच एकमात्र आणि दीर्घकालीन प्रभावी उपाय असल्याचे उपमहापौरांनी स्पष्ट केले.

या मोहिमेच्या अंतर्गत शहरातील एकूण पाणी वापरामध्ये किमान २० टक्के बचत करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी शहरातील पाणीगळती रोखणे, अनधिकृत पाणी वापरावर नियंत्रण ठेवणे, पाण्याचा पुनर्वापर वाढविणे आणि नागरिकांमध्ये जनजागृती करणे या चतुःसूत्रीवर भर दिला जाणार आहे.

उपमहापौरांनी कार वॉश व्यवसायांबाबतही प्रशासनाला विशेष आणि महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. पिण्याच्या पाण्याचा मोठ्या प्रमाणावर वापर करणाऱ्या नवीन कार वॉश केंद्रांना किंवा तत्सम व्यावसायिक प्रकल्पांना परवानगी देताना विशेष दक्षता घ्यावी, असे त्यांनी सांगितले. अशा व्यवसायांनी प्रक्रिया केलेले पाणी किंवा पुनर्वापरित पाण्याचा वापर करणे बंधनकारक करण्याच्या दृष्टीने तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

याशिवाय, शहरातील मुख्य जलवाहिन्यांचे सर्वेक्षण करून गळती असलेल्या भागांची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी, तसेच अनधिकृत नळजोडणी, बायपास लाईन, मीटरमध्ये छेडछाड आणि पाणी चोरी करणाऱ्यांवर कठोर दंडात्मक कारवाई करण्यात यावी, अशा कडक सूचनाही त्यांनी संबंधित विभागाला दिल्या आहेत. घरगुती आणि व्यावसायिक स्तरावर वॉटर प्युरिफायर (आरओ) मधून बाहेर पडणाऱ्या वेस्ट वॉटरचा वापर साफसफाई, फ्लशिंग, बागकाम आणि इतर दुय्यम कामांसाठी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे, ज्यामुळे मोठ्या प्रमाणावर पिण्याच्या पाण्याची बचत होण्यास मदत होणार आहे.

शहरात “माझे पाणी – माझा अभिमान” या अभियानाच्या माध्यमातून शाळा, महाविद्यालये, सामाजिक संस्था, व्यापारी संघटना आणि सर्वसामान्य नागरिकांच्या सहभागातून व्यापक जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे. पाणी बचतीचे महत्त्व नागरिकांपर्यंत पोहोचवून जलसंवर्धनासाठी लोकसहभाग वाढविण्याचा महानगरपालिकेचा प्रामाणिक प्रयत्न राहणार आहे. “वाघूर धरणात सध्या जरी समाधानकारक पाणीसाठा असला तरी भविष्यातील परिस्थिती लक्षात घेऊन आजपासूनच प्रत्येक जळगावकराने पाणी बचतीची सवय लावणे आवश्यक आहे. रेन वॉटर हार्वेस्टिंग, पाण्याचा पुनर्वापर आणि पाण्याचा अपव्यय रोखणे ही काळाची गरज आहे. प्रशासन आणि नागरिक यांच्या संयुक्त सहभागातून जळगाव शहर जलसुरक्षित बनवूया,” असे आवाहन उपमहापौर मनोज चौधरी यांनी शेवटी केले.


Protected Content

Play sound