फैजपूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील अट्रावल येथे मुंजोबाच्या यात्रेला जाणाऱ्या प्रवासी रिक्षाला समोरून येणाऱ्या चारचाकी वाहनाने जोरदार धडक दिल्याने एकाच कुटुंबातील पाच जण जखमी झाल्याची घटना ९ फेब्रुवारी रोजी दुपारी ३.१५ वाजता घडली. याप्रकरणी पैजपूर पोलीस ठाण्यात अज्ञात चारचाकी वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनास्थळी मिळालेल्या माहितीनुसार, प्रकाश कडू घुले (वय ६५, रा. रामेश्वर कॉलनी, जळगाव) हे रिक्षा (क्रमांक MH 19 V 7196) घेऊन कुटुंबासह यावल तालुक्यातील अट्रावल येथे मुंजोबाच्या यात्रेसाठी जात होते. दरम्यान, बामणोद ते भारत रस्त्यावरील वडणाजवळ त्यांच्या रिक्षाला समोरून येणाऱ्या चारचाकी वाहन (क्रमांक MH 19 DJ 1357) ने जोरदार धडक दिली.
या अपघातात धनुष सुनील घुले (वय 5), अर्चना सुनील घुले (वय 28), कमल लक्ष्मण घुले, सविता अनिल घुले आणि वैष्णवी अनिल घुले (सर्व रा. जळगाव) हे गंभीर जखमी झाले. अपघातानंतर घटनास्थळी स्थानिक नागरीकांनी मदतीसाठी धाव घेतली. स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदत करत जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केले. या घटनेनंतर प्रकाश घुले यांनी पैजपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यावरून चारचाकी वाहनाच्या अज्ञात चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल विकास सोनवणे करीत आहेत.