मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | जात आणि धर्माच्या आधारे एकमेकांशी लग्न करणाऱ्या प्रेमी युगुलांच्या सुरक्षेसाठी राज्य सरकारने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. ‘ऑनर किलिंग’च्या वाढत्या घटनांवर आळा घालण्यासाठी आणि अशा जोडप्यांच्या सुरक्षेसाठी सरकारकडून ‘सेफ हाऊस’ उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गृह मंत्रालयाने सर्व पोलीस आयुक्तालये आणि जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयांना अशा ‘सेफ हाऊस’ स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत.
गेल्या महिन्यात महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर, सातारा, लातूर आणि बीड जिल्ह्यांमध्ये ‘ऑनर किलिंग’च्या चार घटना घडल्या आहेत. या घटनांमुळे सरकारने गंभीर दखल घेतली आहे. आंतरजातीय किंवा आंतरधर्मीय प्रेमविवाह करणाऱ्या मुला-मुलींना अनेकदा कुटुंबीयांकडून छळ सहन करावा लागतो, तर काही वेळा त्यांच्या जीवावरही बेतते.
गृह मंत्रालयाने दिलेल्या निर्देशांनुसार, प्रत्येक जिल्ह्यात ‘सेफ हाऊस’ उभारले जाणार आहे. यासाठी पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांची विशेष जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. या सेफ हाऊसमध्ये २४ तास सशस्त्र पोलिसांचा पहारा असणार आहे जेणेकरून जोडप्यांच्या सुरक्षेला कोणताही धोका निर्माण होणार नाही.
२४ तास सशस्त्र पोलिसांचा पहारा: जोडप्यांच्या सुरक्षिततेसाठी सशस्त्र पोलीस कर्मचारी सतत तैनात असतील. सेफ हाऊसमध्ये राहण्यासाठी नाममात्र शुल्क आकारले जाईल, जे एक महिना ते एक वर्षापर्यंत लागू असेल. जोडप्यांच्या गोपनीयतेला प्राधान्य देऊन सेफ हाऊसचे स्थान गुप्त ठेवले जाईल.
गृह मंत्रालयाचे म्हणणे आहे की, या निर्णयाचा उद्देश प्रेमविवाह करणाऱ्या जोडप्यांना सुरक्षित आणि आधार देणारे वातावरण निर्माण करणे आहे. कुटुंबीयांचा किंवा समाजाचा दबाव टाळण्यासाठी ही उपाययोजना अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. राज्यातील नागरिकांनी या सेफ हाऊस सुविधेचा लाभ घ्यावा आणि कोणत्याही प्रकारच्या धमकावण्याचा बळी न पडता आपले आयुष्य सुरक्षितपणे जगावे, असे आवाहन राज्य सरकारने केले आहे.