जळगाव प्रतिनिधी । विधानसभा निवडणुकीत विजयी झालेले आमदार राजूमामा भोळे यांना शुभेच्छा देऊन महाआघाडीचे उमेदवार अभिषेक पाटील यांनी मनाचा उमदेपणा दाखवू दिला आहे.
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत जळगावातून महायुतीचे आमदार राजूमामा भोळे यांच्या विरूध्द महाआघाडीतर्फे राष्ट्रवादीचे महानगराध्यक्ष अभिषेक पाटील यांना उमेदवारी मिळाली होती. त्यांना ऐन वेळी उमेदवारी मिळाल्याने प्रचारासाठी साहजीकच कमी वेळ मिळाला. असे असले तरी त्यांनी चांगली लढत देण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, निवडणुकीत त्यांना अपयश येऊन राजूमामा विजयी झाले. मात्र निकालाच्या दुसर्याच दिवशी म्हणजे आज अभिषेक पाटील यांनी आमदार भोळे यांच्या कार्यालयास भेट देऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. राजकारणातील विरोध हा वैचारिक स्वरूपाचा असावा, तो वैयक्तीक असू नये असे नेहमी म्हटले जाते. याचा विचार करता अभिषेक पाटील यांच्या मनाचा हा मोठेपणा नक्कीच कौतुकास्पद आहे.