जळगावात भाजपाविरोधात अन्य पक्षांचा उमेदवार ठरेना

jalgaon vartapatra

राजकीय वार्तापत्र : जितेंद्र कोतवाल

जळगाव । सन २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत मोदी लाटेत भाजपाच्या तिकीटावर विद्यमान आमदार सुरेश भोळे हे जळगाव शहर मतदार संघातून निवडून आले. आमदार भोळे यांनी सुरूवातीपासून शहरातील प्रत्येक समाज घटकाच्या कोणत्याही कार्यक्रमाला हजेरी लावून सर्वसामान्य जनतेच्या मनात आपल्याविषयी आपुलकी निर्माण केली आहे. त्यांच्या विरोधात अन्य पक्षांकडून इच्छुकांची नावे बरीच असली तरी भाजपाला टक्कर देऊ शकेल असा योग्य उमेदवार देण्यासाठी चाचपणी सुरु आहे.

 

जळगाव मतदार संघात अपयशी ठरलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचा जनसंपर्क आणि कार्यकर्त्यांशी संवाद कमी झाला आहे. त्या तुलनेत भाजपा सत्तेत असतांनाही त्यांनी पक्ष संघटन आणि मतदारांशी संपर्क वाढविण्यावर भर दिला आहे.  अनुकुल वातावरण जरी असले तरी लोकसभा निवडणुकीत खासदारकीसाठी आमदार स्मिताताई वाघ यांचे नाव निश्चित असतांना त्यांचे तिकीट ऐनवेळी कापल्याने विद्यमान आमदार राजूमामा भोळे यांची धाकधुक वाढली असल्याचे दिसते.

जळगाव मतदार संघाला १९६२ च्या विधानसभा निवडणूकीत प्रतिभा पाटील यांच्या रूपाने पहिला आमदार मिळाला होता. त्यानंतर जळगाव मतदार संघाचे सन १९६२ ते २०१४ पर्यंत क्रमाक्रमाने काँग्रेस-आय, काँग्रेस-एस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना या पक्षांनी नेतृत्व केले. यात १९८० ते २०१४ पर्यंत सुरेश जैन हेच वेगवेगळ्या पक्षांतर्फे आमदार म्हणून जळगावचे नेतृत्त्व करीत होते. येथून ते सलग आठ वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. या मतदार संघात काँग्रेस आय-३ टर्म, काँग्रेस एस-२, शिवसेना-३, राष्ट्रवादी काँग्रेस-२ व भाजपा-१ टर्म याप्रमाणे पक्षांची सत्ता राहिली आहे. सुरेश जैन हे घरकुल घोटाळाप्रकरणी नाशिक मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत आहेत. गेल्या निवडणुकीच्या वेळीही ते कारागृहातच होते आणि आताही निवडणुक होताना कदाचित ते आतच असतील, हा दुर्दैवी योगायोग म्हणता येईल.

जळगाव मतदारसंघात लेवा पाटील, कोळी आणि मराठा पाटील समाजांचे प्राबल्य आहे. शहराची लोकसंख्या पाच लाखांहून अधिक आहे. मतदारांची संख्या चार लाख १९६ आहे. त्यात पुरुष मतदार दोन लाख १० हजार ८६१ तर स्त्री मतदार एक लाख ८९ हजार ३०१ आहे. इतर मतदारांमध्ये ३४, सैनिक मतदान २३७ आणि दिव्यांग मतदान ८७१ आहेत.

विधानसभा निवडणुकीत भाजपा व शिवसेनेच्या युतीची शक्यता जरी असली तरी गेल्या पंधरवाड्यात भाजपातर्फे इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या, त्यात अ‍ॅड.सुचिता हाडा, सुनील खडके, अरुण बोरोले, चंद्रकांत बेंडाळे, डॉ.सूर्यवंशी आदींसह एकूण नऊ जणांना हजेरी लावल्याची चर्चा आहे. गेल्या महिन्यात मुख्यमंत्र्यांची जनादेश यात्रा काढण्यात आली होती. त्यावेळी शहरात झालेल्या जाहीर सभेत पालकमंत्री गिरीश महाजन यांनी भोळे यांना उद्देशून मामा तुम्ही तिकिटाची चिंता करु नका, तिकिट मामींनाही मिळू शकते, असे सांगून टाकले होते. त्यामुळे आ.भोळे यांचे तिकीट पक्के मानले जात आहे. मनपाची कर्जमुक्ती, विकास योजनांसाठी निधी आणणे, तसेच उत्तम जनसंपर्क या त्यांच्या जमेच्या बाजू आहेत. जळगावातून उमेदवारीसाठी नगरसेवक कैलास सोनवणे हे इच्छूक होते, मात्र ते ही आता घरकुलप्रकरणी कारागृहात आहेत. शिवसेनेचे नेते सुरेश जैन कारागृहात असल्यामुळे सेनेची स्थिती नेतृत्त्वहीन झाली आहे, आमदार भोळे यांच्यासाठी राजकीय पोषक वातावरण चांगले निर्माण झाले आहे.

येथील महानगरपालिका वर्षानुवर्षे कर्जात असल्याने शहराचा विकास झाला नाही. महापालिकेत खान्देश विकास आघाडीची दीर्घकाळ सत्ता असल्याने विकास न होण्याची आणि कर्जाची जबाबदारी त्यांच्यावरच होती. त्यामुळे विधानसभा निवडणुकीपाठोपाठ भाजपाने महापालिकेतही त्यांना मात देत महानगरपालिकेची सत्ता मिळवली. मनपात भाजपाची सत्ता आल्यानंतर अमृत योजना, मनपा कर्जमुक्ती सारखी रखडलेली कामे मार्गी लागली आहेत. त्याचाही फायदा येत्या विधानसभा निवडणूकीत भाजपा उमेदवाराला होणार आहे.

त्याचवेळी शिवसेना-भाजपची युती होईल अथवा नाही, याबाबत अद्यापही निश्चित सांगता येत नाही. युती झाल्यास हा मतदार संघ कुणाला सुटणार ? याविषयी चर्चा सुरु झाली आहे. युती न झाल्यास भाजपतर्फे भोळे यांना संधी मिळू शकते तर शिवसेनेतर्फे माजी महापौर विष्णू भंगाळे अथवा नगरसेवक सुनील महाजन यांची नावे चर्चेत आहेत. काँग्रेसतर्फे डॉ.राधेश्याम चौधरी आणि माजी खासदार डॉ.उल्हास पाटील यांच्या कन्या डॉ.केतकी पाटील यांची नावे चर्चेत आहेत. युती आणि आघाडीचे जागा वाटप व इच्छुकांची संख्या बघता येथे प्रत्येक राजकीय पक्षाला उमेदवारीसाठी चांगलीच माथापच्ची करावी लागणार आहे, तरीही अनेक इच्छुक नाराज राहून ते काय भूमिका घेतात. याशिवाय मनसे, बहुजन वंचित आघाडी आणि एम.आय.एम.सारखे दुसऱ्या फळीतील पक्ष उमेदवारीबाबत काय निर्णय घेतात, तसेच कोणत्या मुख्य पक्षाच्या मतांमध्ये वाटा पाडतात, ते ही महत्वाचे राहणार आहे. या सगळ्या घडामोडींवर विजयाची गणिते ठरणार आहेत.

Protected Content