यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील मोहराळा गावात गेल्या पाच दिवसांपासून बेपत्ता असलेल्या एका १९ वर्षीय तरुणाचा मृतदेह शुक्रवारी विहिरीत आढळून आला. या घटनेमुळे संपूर्ण गावात मोठा तणाव निर्माण झाला असून, मृत तरुणाच्या कुटुंबीयांनी त्याच्या मृत्यूमागे घातपात असल्याचा संशय व्यक्त केला आहे. या पार्श्वभूमीवर संतप्त जमावाने एका चारचाकी वाहनाची तोडफोड केल्याने वातावरण अधिकच चिघळले आहे.
साहिल शब्बीर तडवी (वय १९) असे मृत तरुणाचे नाव असून, तो १६ जूनपासून बेपत्ता होता. कुटुंबीयांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला होता, मात्र त्याचा थांगपत्ता न लागल्याने यावल पोलिस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. अखेर शुक्रवारी साहिलचा मृतदेह मोहराळा गावाजवळील वड्रीकडे जाणाऱ्या रस्त्यालगत असलेल्या शेतातील विहिरीत आढळून आला.
तरुणाचा मृतदेह मिळाल्याची माहिती गावात पसरताच ग्रामस्थ संतप्त झाले. त्यांनी गावातील एका कुटुंबावर संशय व्यक्त करत त्यांच्या घराबाहेरील चारचाकी वाहनाची तोडफोड केली. जमावाच्या या आक्रमकतेनंतर गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले. घटनेची गंभीरता ओळखून पोलिस निरीक्षक रंगनाथ धारबळे, हवालदार वासुदेव मराठे, सुनील पाटील आणि अमित तडवी हे तातडीने घटनास्थळी दाखल झाले.
मृत साहिलच्या कुटुंबीयांनी शवविच्छेदन इन कॅमेरा पद्धतीने करण्याची मागणी केली असून, पोलिसांनी मृतदेह यावल ग्रामीण रुग्णालयात पाठवला आहे. रात्री ८.१५ वाजेच्या सुमारास विहिरीतून मृतदेह बाहेर काढण्यात आला. घटनेनंतर मोहराळा गावात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, हवालदार नीलेश चौधरी, मोहन तायडे, अल्लाउद्दीन तडवी, भरत कोळी आणि सागर कोळी यांच्यासह अतिरिक्त कर्मचारी गावात गस्त घालत आहेत.
पोलिसांनी तपासासाठी काही जणांना ताब्यात घेतले असून, मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदनानंतर स्पष्ट होणार आहे. मात्र मृतदेह सापडल्यापासून गावात संताप आणि अस्वस्थता पसरली असून, प्रशासनाने परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी सतर्कता बाळगली आहे.