Home क्राईम पाचोरा बसस्थानकात चोरी करणारी महिला जेरबंद ; सोन्याचा ऐवज हस्तगत

पाचोरा बसस्थानकात चोरी करणारी महिला जेरबंद ; सोन्याचा ऐवज हस्तगत


पाचोरा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । पाचोरा बसस्थानक परिसरात गर्दीचा फायदा घेत प्रवाशांच्या दागिन्यांवर डल्ला मारणाऱ्या एका महिलेला पाचोरा पोलिसांनी अवघ्या काही तासांत जेरबंद करत चोरीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या कारवाईमुळे बसस्थानक परिसरात होणाऱ्या चोरीच्या घटनांना आळा बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

जळगाव जिल्ह्यातील बसस्थानक परिसरात वाढत्या चोरीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी कठोर भूमिका घेत संबंधित गुन्ह्यांचा छडा लावण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने पाचोरा पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक सक्रिय करण्यात आले होते. याच दरम्यान १५ एप्रिल रोजी घडलेल्या चोरीच्या घटनेने पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे केले होते.

फिर्यादी जयश्री स्वप्नील पाटील (वय २२, रा. विवेकानंद कॉलनी, भडगाव रोड, पाचोरा) या आसनखेडा येथून पाचोरा येथे एम. एम. कॉलेजमध्ये परीक्षा देण्यासाठी बसने आल्या होत्या. परीक्षा संपल्यानंतर दुपारी सुमारे १२:३० वाजता त्या पुन्हा आसनखेड्याकडे जाण्यासाठी जळगाव बसमध्ये चढल्या असताना गर्दीचा फायदा घेत अज्ञात व्यक्तीने त्यांच्या गळ्यातील सुमारे तीन ग्रॅम वजनाची सोन्याची पोत चोरून नेली. या प्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल होताच गुन्हा नोंदवण्यात आला.

तक्रारीनंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरू करत गोपनीय माहितीच्या आधारे संशयितांचा शोध घेतला. तपासादरम्यान संगिता करण सोळुंखी (वय ४२) ही महिला बसस्थानक परिसरात चोरी करत असल्याची माहिती मिळाल्यानंतर गुन्हे शोध पथकाने सापळा रचून तिला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान तिने गुन्ह्याची कबुली देत चोरी केलेला मुद्देमाल—एक सोन्याचा मणी आणि दोन डोरले—पोलिसांच्या स्वाधीन केला.

ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी बापू रोहम यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. पथकात प्रभारी पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार, पोलीस उपनिरीक्षक कृष्णा घायाळ, सहाय्यक फौजदार विलास पाटील, पोलीस हेड कॉन्स्टेबल श्रीकांत गायकवाड, तसेच योगेश पाटील, गणेश कुवंर आणि महिला पोलीस अंमलदार प्रिया आहेर यांचा समावेश होता. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल श्रीकांत गायकवाड करत आहेत.


Protected Content

Play sound