जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । महाराष्ट्र राज्यातील विविध शासकीय विभाग आणि मंत्रालयामध्ये रिक्त असलेल्या लघुलेखक (स्टेनोग्राफर) संवर्गातील पदांची भरती तातडीने करण्यात यावी, या मागणीसाठी राज्यातील विद्यार्थ्यांनी आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. यासंदर्भात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री महोदयांना निवेदन सादर करण्यात आले असून, रखडलेली भरती प्रक्रिया त्वरित सुरू करण्याची विनंती करण्यात आली आहे.
निवेदनानुसार, मंत्रालयातील स्टेनोग्राफर पदांची शेवटची भरती एप्रिल २०२२ मध्ये झाली होती. त्यानंतर चार वर्षांचा कालावधी उलटूनही कोणतीही नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली नाही. धक्कादायक बाब म्हणजे, अलीकडेच मंत्रिमंडळ बैठकीत पूर्वी निर्माण केलेले १२६ संवर्ग रद्द करण्याचा निर्णय घेतल्याचे समजते, ज्यात लघुलेखक पदांचाही समावेश असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर असंतोष पसरला आहे.

शासनाच्या परस्परविरोधी धोरणांवर टीका
एकीकडे शासन ‘अमृत टायपिंग योजने’अंतर्गत विद्यार्थ्यांना आर्थिक साहाय्य देऊन या क्षेत्राकडे आकर्षित करत आहे, तर दुसरीकडे प्रत्यक्ष रोजगाराची संधी नाकारली जात आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद (GCC) मार्फत दर सहा महिन्यांनी परीक्षा होऊन हजारो विद्यार्थी उत्तीर्ण होतात, मात्र भरती नसल्याने त्यांच्या प्रमाणपत्रांचे भविष्य अनिश्चित झाले आहे.
विद्यार्थ्यांच्या प्रमुख मागण्या:
एप्रिल २०२२ नंतर प्रलंबित असलेली भरती तातडीने जाहीर करावी. लघुलेखक पदे रद्द न करता ती नियमितपणे दरवर्षी भरण्यात यावीत. रद्द करण्यात आलेल्या १२६ संवर्गांच्या निर्णयाचा फेरविचार व्हावा. भरती प्रक्रियेचे ठोस वेळापत्रक निश्चित करून त्याची अंमलबजावणी व्हावी.
दीर्घकाळ भरती न निघाल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांची वयोमर्यादा संपत चालली असून, आर्थिक आणि मानसिक तणावामुळे विद्यार्थ्यांमध्ये नैराश्याचे वातावरण आहे. सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष न दिल्यास पात्र उमेदवारांचे मोठे नुकसान होईल, असा इशाराही या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.



