Home Cities जळगाव घरकुलांच्या रखडलेल्या कामांवर सीईओ करिश्मा नायर यांचा बडगा; दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांना कारवाईचा...

घरकुलांच्या रखडलेल्या कामांवर सीईओ करिश्मा नायर यांचा बडगा; दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांना कारवाईचा इशारा

0
1


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी ।  पंतप्रधान आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत मंजूर झालेल्या आणि अद्याप अपूर्ण असलेल्या घरकुलांची कामे तातडीने पूर्ण करण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने कडक भूमिका घेतली आहे. पाचोरा तालुक्यात घरकुलांच्या कामात दिरंगाई, टाळाटाळ किंवा निष्काळजीपणा करणाऱ्या ग्रामपंचायत अधिकाऱ्यांवर थेट प्रशासकीय कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांनी दिला आहे.

पाचोरा पंचायत समितीच्या सभागृहात आयोजित ग्रामपंचायत अधिकारी व ग्रामीण गृहनिर्माण अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत त्यांनी घरकुल योजनांच्या प्रगतीचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक आर. एस. लोखंडे, गटविकास अधिकारी एस. एस. मुंडे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत पंतप्रधान आवास योजना (ग्रामीण) टप्पा १ आणि टप्पा २ अंतर्गत मंजूर, पूर्ण आणि अपूर्ण घरकुलांची गावनिहाय माहिती तपासण्यात आली. पहिला आणि दुसरा हप्ता वितरित होऊनही अद्याप बांधकाम पूर्ण न झालेल्या घरकुलांची कारणे जाणून घेण्यात आली. तसेच जागा उपलब्ध असूनही अतिक्रमण, स्थानिक अडचणी किंवा अन्य कारणांमुळे रखडलेल्या प्रकरणांवर विशेष चर्चा करण्यात आली.

करिश्मा नायर यांनी ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना प्रत्येक लाभार्थ्याशी नियमित संपर्क ठेवण्याच्या सूचना दिल्या. लाभार्थ्यांना बांधकाम सुरू करण्यासाठी प्रोत्साहित करावे, स्थानिक प्रशासन, महसूल विभाग आणि संबंधित यंत्रणांशी समन्वय साधून सर्व अडथळे दूर करावेत तसेच प्रलंबित घरकुले तातडीने पूर्ण करण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत, असे निर्देश त्यांनी दिले.

घरकुलांच्या कामांमध्ये कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा सहन केला जाणार नाही, असे स्पष्ट करत त्यांनी कामाच्या प्रगतीचा नियमित आढावा घेतला जाईल आणि दुर्लक्ष करणाऱ्या संबंधित ग्रामपंचायत अधिकाऱ्यांवर थेट प्रशासकीय कारवाई करण्यात येईल, असा इशाराही दिला.

पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना वेळेत स्वतःचे घर उपलब्ध व्हावे, हा प्रशासनाचा उद्देश असून यासाठी सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी जबाबदारीने काम करून रखडलेली घरकुले लवकरात लवकर पूर्ण करावीत, असे आवाहनही बैठकीत करण्यात आले.


Protected Content

Play sound