


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । प्रवाशांची वाढती संख्या आणि प्रवासातील गैरसोय लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. गाडी क्रमांक 19021/19022 उधना–ब्रह्मपूर अमृत भारत एक्सप्रेस ही रेल्वे आता आठवड्यातून तीन दिवसांऐवजी दररोज धावणार आहे. ही नवीन व्यवस्था 9 जुलै 2026 पासून लागू होत असून, उत्तर महाराष्ट्रासह गुजरात, विदर्भ, छत्तीसगड आणि ओडिशाकडे प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांना याचा मोठा लाभ होणार आहे.
रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, गाडी क्रमांक 19021 उधना–ब्रह्मपूर अमृत भारत एक्सप्रेस ही 9 जुलै 2026 पासून उधना येथून दररोज धावेल. तर गाडी क्रमांक 19022 ब्रह्मपूर–उधना अमृत भारत एक्सप्रेस ही 10 जुलै 2026 पासून ब्रह्मपूर येथून दररोज प्रवाशांच्या सेवेत उपलब्ध राहणार आहे. यापूर्वी ही गाडी त्रि-साप्ताहिक धावत होती. मात्र, वाढती प्रवासी संख्या लक्षात घेऊन तिची वारंवारता वाढविण्यात आली आहे. या गाडीला बारडोली, व्यारा, नवापूर, नंदुरबार, दोंडाईचा, सिंदखेडा, अमळनेर, धरणगाव, जळगाव, भुसावळ, मलकापूर, अकोला, बडनेरा, वर्धा, नागपूर, गोंदिया, दुर्ग, रायपूर, महासमुंद, खरियार रोड, कांटाबांजी, टिटलागढ, केसिंगा, मुनिगुडा, रायगडा, पार्वतीपुरम, बोब्बिली, विजयनगरम, श्रीकाकुलम रोड आणि पलासा या स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे. त्यामुळे जळगाव जिल्ह्यातील प्रवाशांसह उत्तर महाराष्ट्रातील नागरिकांना दररोजची रेल्वे सुविधा उपलब्ध होणार आहे.
या अमृत भारत एक्सप्रेसमध्ये प्रवाशांच्या सोयीसाठी 11 सामान्य श्रेणीचे डबे, 8 शयनयान (स्लीपर) डबे, 1 पॅन्ट्री कार तसेच 2 दिव्यांग, सामान व गार्ड कोच अशी एकूण 22 डब्यांची रचना करण्यात आली आहे. त्यामुळे विविध श्रेणीतील प्रवाशांना अधिक सोयीस्कर आणि आरामदायी प्रवासाचा पर्याय उपलब्ध होणार आहे. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना या गाडीच्या धावण्याच्या दिवसांमध्ये झालेल्या बदलाची नोंद घेण्याचे आवाहन केले आहे. तसेच या वाढीव सुविधेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असेही प्रशासनाने म्हटले आहे. रेल्वेचे अद्ययावत वेळापत्रक, थांबे आणि इतर माहिती जाणून घेण्यासाठी प्रवाशांनी भारतीय रेल्वेच्या अधिकृत चौकशी संकेतस्थळाचा वापर करावा किंवा रेल्वे चौकशी सेवा 139 वर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.



