अमळनेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील मारवड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात मध्यरात्री उपचारासाठी आलेल्या जखमी तरुणीला कुलूपबंद दारामुळे परत जावे लागल्याची धक्कादायक घटना समोर आली असून, या प्रकारामुळे आरोग्य व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कोट्यवधींचा निधी खर्च करून उभारण्यात आलेले केंद्र प्रत्यक्षात मात्र ‘रामभरोसे’ असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, खेडी येथील पोलीस पाटील यांच्या कन्येला काल मध्यरात्रीच्या सुमारास घरात अचानक चक्कर येऊन ती खाली पडल्याने दुखापत झाली. गावात तातडीची वैद्यकीय सेवा उपलब्ध नसल्याने कुटुंबीयांनी तिला तत्काळ मारवड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले. मात्र तेथे पोहोचल्यावर आरोग्य केंद्राला कुलूप असल्याचे दिसून आले. त्यामुळे तातडीच्या उपचारांपासून रुग्ण वंचित राहिली आणि कुटुंबीयांना मोठा मानसिक त्रास सहन करावा लागला.

मारवड प्राथमिक आरोग्य केंद्र हे परिसरातील अनेक गावांसाठी मुख्य आरोग्य सुविधा देणारे केंद्र मानले जाते. या केंद्राअंतर्गत चार उपकेंद्रे कार्यरत आहेत. अशा परिस्थितीत मुख्य केंद्रातच रात्रपाळीत एकही वैद्यकीय अधिकारी किंवा कर्मचारी उपलब्ध नसणे ही गंभीर बाब असल्याची प्रतिक्रिया स्थानिकांनी व्यक्त केली. नव्याने उभारलेल्या या केंद्रावर कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्यात आला असला तरी प्रत्यक्षात मूलभूत सेवा उपलब्ध नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे.
या घटनेनंतर खेडी येथील पोलीस पाटील पती आणि ग्रामस्थांनी संताप व्यक्त करत संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे. आरोग्य केंद्र ‘रामभरोसे’ चालले आहे का, असा सवाल उपस्थित करत त्यांनी प्रशासनाला जाब विचारला आहे. ग्रामीण भागात आरोग्य सेवा सक्षम करण्यासाठी शासन प्रयत्न करत असताना प्रत्यक्षात अशा प्रकारच्या निष्काळजीपणामुळे नागरिकांचा विश्वास डळमळीत होत असल्याचेही त्यांनी नमूद केले.



