



चोपडा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । चोपडा शहरात गोरक्षकांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ बुधवारी सायंकाळी भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले असून या मोर्चाला शहरवासीयांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. सुमारे सहा हजार नागरिकांनी एकत्र येत निषेध व्यक्त केला आणि दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली.
सायंकाळी सहा वाजता महात्मा गांधी चौकातून मोर्चाची सुरुवात झाली. शहरातील विविध भागातून नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. घोषणाबाजी करत आणि फलक घेऊन मोर्चेकरी पुढे सरकत छत्रपती शिवाजी महाराज चौकात पोहोचले. मोर्चादरम्यान कायदा व सुव्यवस्थेची काळजी घेण्यासाठी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
छत्रपती शिवाजी महाराज चौकात पोहोचल्यानंतर प्राणी फाउंडेशन गुजरातच्या नेहा पटेल, सुशील महाराज विटनेरकर, संजय शर्मा, बाबा महाहंस आणि रोहित निकम यांनी आपले मनोगत व्यक्त केले. वक्त्यांनी गोरक्षकांवर झालेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध करत अशा प्रकारच्या घटनांवर तातडीने कारवाई करण्याची गरज अधोरेखित केली.
मोर्चाच्या माध्यमातून प्रशासनाला देण्यात आलेल्या निवेदनात गोतस्करी रोखण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या गोरक्षकांवर हल्ला करणाऱ्यांवर तत्काळ गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करण्यात आली. तसेच संबंधित प्रकरणात पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांनी आरोपींना पाठीशी घातल्याचा आरोप करत त्यांच्या निलंबनाची मागणीही करण्यात आली. हे निवेदन तहसीलदार भाऊसाहेब थोरात आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब घोलप यांना देण्यात आले.
मोर्चात सहभागी झालेल्या नागरिकांनी शांततेत निषेध नोंदवत प्रशासनाने योग्य ती कारवाई करावी, अशी एकमुखी मागणी केली. या घटनेमुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असले तरी मोर्चा शांततेत पार पडला.



