सावदा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील कोचुर खुर्द ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी विराजमान असलेल्या ज्योती संतोष कोळी यांच्यावर बनावट जातप्रमाणपत्र सादर करून फसवणूक केल्याचा गंभीर आरोप होत असून, या प्रकरणाने गावात मोठा राजकीय आणि सामाजिक खळबळ उडवली आहे. या प्रकरणात रावेर तहसीलदार कार्यालयाकडून सरपंचाला २६ जूनपर्यंत खुलासा सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
ज्योती कोळी या अनुसूचित जमातीतील ‘टोकरी कोळी’ या प्रवर्गाच्या आरक्षणावर निवडून आल्याचा दावा करत सरपंचपदावर निवडून आल्या. मात्र त्यांनी खोट्या सही आणि शिक्क्याच्या आधारे बनावट जातप्रमाणपत्र तयार करून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सादर केल्याचा आरोप गावातीलच ग्रामपंचायत सदस्य कविता पाटील, गणेश महाजन, लिलाबाई तायडे व प्रशांत तायडे यांनी केला आहे. या सदस्यांनी तक्रारीसह आवश्यक पुरावे तहसीलदारांकडे सादर केले आहेत.
या गंभीर तक्रारीच्या पार्श्वभूमीवर रावेर तहसीलदारांनी सरपंच ज्योती कोळी यांना लेखी नोटीस बजावली आहे. २६ जून २०२५ पर्यंत आपणावर असलेल्या आरोपांवर खुलासा सादर करण्याचे आदेश देण्यात आले असून, मूळ कागदपत्रांसह प्रत्यक्ष तहसील कार्यालयात उपस्थित राहण्याचे स्पष्ट निर्देशही नोटीसमध्ये नमूद आहेत.
गावात या संपूर्ण प्रकरणाबाबत चांगलीच चर्चा रंगली असून, सरपंचपदावर बनावट कागदपत्रांच्या आधारे निवड झाल्याचा संशय बळावत आहे. या तक्रारीनंतर गावकऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे आणि सर्वांचे लक्ष आता तहसीलदारांकडून होणाऱ्या कारवाईकडे लागले आहे.