मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जिल्ह्यात बनावट आणि अनधिकृत खतांची विक्री रोखण्यासाठी कृषी विभागाने आता आक्रमक पाऊले उचलली आहेत. मुक्ताईनगर येथील ‘भूमिविकास ॲग्रो एजन्सी’वर जिल्हास्तरीय भरारी पथकाने छापा टाकून मोठ्या प्रमाणावर संशयास्पद खतांचा साठा जप्त केला असून, या कारवाईमुळे कृषी विक्रेत्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
मुक्ताईनगर येथील या एजन्सीमध्ये अनधिकृत खतांचा साठा असल्याची गोपनीय माहिती भरारी पथकाला मिळाली होती. या माहितीची शहानिशा करण्यासाठी कृषी विकास अधिकारी श्री. मस्के, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक श्री. बोरसे आणि मुक्ताईनगर कृषी विभागाच्या पथकाने संबंधित एजन्सीसह त्यांच्या गोदामाची अचानक तपासणी केली.

या तपासणी दरम्यान पथकाला अनेक गंभीर बाबी आढळून आल्या. गोदामात असलेला खतांचा साठा एजन्सीच्या अधिकृत परवान्यात नोंदवलेला नव्हता. तसेच, ‘वरिता ॲग्रो, जळगाव’ या कंपनीचे ’00:52:34 W-S’ आणि ’00:00:50 W-S’ ही खते मोठ्या प्रमाणात विस्कळीत अवस्थेत सापडली. विशेष म्हणजे, या खतांच्या गोणींवर आवश्यक असलेला बॅच नंबर आणि परवाना क्रमांकही नमूद नव्हता, जे नियमांचे स्पष्ट उल्लंघन आहे.
खतांच्या गुणवत्तेबाबत संशय बळावल्याने पथकाने तातडीने नमुने घेऊन ते नाशिक येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले आहेत. प्रयोगशाळेचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबंधित कंपनी आणि एजन्सीवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. सध्या या एजन्सीच्या गोदामाला सील ठोकण्यात आले असून विक्रीवर पूर्णतः बंदी घालण्यात आली आहे. संबंधित कंपनीकडे विक्रीचा अधिकृत परवाना आहे का, याचीही कसून चौकशी सुरू आहे.
शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी आणि त्यांना दर्जेदार खते मिळावीत यासाठी कृषी विभाग कटिबद्ध असल्याचे अधिकाऱ्यांनी यावेळी स्पष्ट केले. कोणत्याही प्रकारची अनधिकृत विक्री खपवून घेतली जाणार नाही, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे. दरम्यान, शेतकऱ्यांनी खते खरेदी करताना अधिकृत परवाना आणि बॅच नंबरची खात्री करूनच खरेदी करावी, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.



