यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । यावल एसटी आगारातून लांब पल्याच्या बससेवेचे चक्र पुन्हा गती घेत असून, माहूरगड बससेवेच्या यशानंतर आता यावल-मेहकर मार्गावरही एसटी सेवा सुरू करण्याची मागणी नागरिक व प्रवासी वर्गाकडून जोर धरत आहे. प्रवाशांच्या सुविधांचा विचार करता आणि आगाराच्या उत्पन्नात वाढ साधण्यासाठी ही बससेवा सुरू होणे आवश्यक असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
गेल्या काही वर्षांपासून यावल एसटी आगार अनेक अडचणींचा सामना करत आहे. बसगाड्यांची कमतरता, वारंवार नादुरुस्त होणाऱ्या गाड्या, तसेच चालक व वाहकांच्या ५० हून अधिक रिक्त पदांमुळे या आगाराची स्थिती अत्यंत बिकट होती. मात्र, ग्रामीण भागातील नागरिकांनी ‘लालपरी’वर दाखवलेला विश्वास आणि त्यातून वाढलेला प्रवासाचा ओघ पाहता आगाराला नवसंजीवनी मिळाली आहे.
विशेष म्हणजे, एप्रिल २०२४ ते जून २०२५ या कालावधीत यावल ते माहूरगड या मार्गावर धावणाऱ्या एसटी बसने जवळपास १ कोटी ५७ लाख रुपयांचे उत्पन्न कमावले आहे. या उत्पन्नवाढीचा मुख्य आधार म्हणजे प्रवाशांकडून मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद. यामुळे आगार प्रशासनासह राज्य परिवहन विभागालाही या मार्गाचे महत्त्व स्पष्ट झाले आहे.
आता हाच अनुभव लक्षात घेऊन, यावल ते मेहकर दरम्यान एक नियमित बससेवा सुरू करावी, अशी प्रवाशांची आग्रही मागणी आहे. विशेषतः रेल्वेने उशिरा रात्री भुसावळ स्थानकात पोहोचणाऱ्या प्रवाशांना आपल्या गावी पोहोचण्यासाठी तात्काळ साधन उपलब्ध व्हावे यासाठी रात्री ११ वाजता भुसावळ येथून सुटणारी यावल-मेहकर बस सुरू करण्यात यावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.
यावल एसटी आगाराचे व्यवस्थापक दिलीप महाजन यांच्याकडे देखील ही मागणी पोहोचली असून, आगाराच्या उत्पन्नात वाढ व प्रवाशांच्या सोयीसाठी यावल-मेहकर बससेवा सुरू करण्याबाबत विचार सुरू असल्याचे समजते. ही सेवा सुरू झाल्यास संपूर्ण परिसरातील नागरिकांना दिलासा मिळणार असून, आगाराच्या आर्थिक स्थितीतही सुधारणा होईल.