Home क्राईम सिमेंटच्या गोण्या ठेवण्यावरून तरुणावर लोखंडी रॉडने जीवघेणा हल्ला !

सिमेंटच्या गोण्या ठेवण्यावरून तरुणावर लोखंडी रॉडने जीवघेणा हल्ला !


चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । किरकोळ कारणावरून वाद होऊन त्याचे रूपांतर गंभीर हाणामारीत झाल्याची धक्कादायक घटना चाळीसगाव तालुक्यातील कोदगाव येथे घडली आहे. सिमेंटच्या गोण्या ठेवताना उडणाऱ्या धुळीबाबत हटकल्याचा राग मनात धरून, चार जणांनी मिळून एका ३२ वर्षीय तरुणावर लोखंडी रॉडने जीवघेणा हल्ला केला. या प्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी दिगंबर पोपट पाटील (वय ३२, रा. कोदगाव) हे आपल्या घराशेजारी असताना आरोपी भूषण पाटील हा सिमेंटच्या गोण्या उतरवत होता. यावेळी सिमेंटची प्रचंड धूळ उडत असल्याने दिगंबर पाटील यांनी “गोण्या हळू ठेव, धूळ उडत आहे,” असे सांगितले. मात्र, याच गोष्टीचा राग आरोपीला आला. यावरून सुरुवातीला शाब्दिक चकमक झाली आणि आरोपींनी पाटील यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत “तुमचा कायमचा विषय संपवून टाकू” अशी धमकी दिली.

रस्त्यात अडवून केला हल्ला
दिगंबर पाटील हे या प्रकाराची तक्रार देण्यासाठी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनकडे आपल्या दुचाकीने जात असताना, आरोपींनी त्यांचा पाठलाग केला. जिल्हा परिषद मराठी शाळेजवळ आरोपी भूषण पाटील, पंकज पाटील, आप्पासाहेब पाटील आणि रणजित पाटील यांनी त्यांची दुचाकी अडवली. दुचाकीची चावी काढून घेत आरोपी भूषण पाटील याने आपल्या हातातील लोखंडी रॉडने दिगंबर यांच्या कपाळावर आणि डाव्या हातावर जोरात प्रहार केले. या हल्ल्यात दिगंबर पाटील गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. याप्रकरणी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास फौजदार सुभाष पाटील हे करीत आहे.


Protected Content

Play sound