Home Cities जळगाव जळगाव जिल्ह्यात आठ नवीन ग्रामपंचायतींना शासनाची मान्यता

जळगाव जिल्ह्यात आठ नवीन ग्रामपंचायतींना शासनाची मान्यता


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जिल्ह्यातील ग्रामीण प्रशासकीय रचनेत मोठा बदल झाला असून, राज्य शासनाने आठ नवीन ग्रामपंचायतींच्या निर्मितीला हिरवा कंदील दाखवला आहे.

यापूर्वी जिल्ह्यात ११६० ग्रामपंचायती कार्यरत होत्या, मात्र आता नव्या प्रस्तावांमुळे ही संख्या ११६८ वर पोहोचली आहे. १५ व्या वित्त आयोगाच्या माध्यमातून मिळणारा थेट निधी आणि वाढलेले अधिकार यामुळे अनेक गावांमधून स्वतंत्र ग्रामपंचायतीची मागणी केली जात होती.

शासनाने नवीन ग्रामपंचायत स्थापनेसाठी असलेल्या लोकसंख्येच्या अटीत शिथिलता आणली आहे. पूर्वी किमान १ हजार लोकसंख्येचा निकष होता, जो आता ७०० पर्यंत कमी करण्यात आला आहे. तसेच, मूळ गाव आणि तांड्यांमधील अंतराची ३ किमीची जाचक अटही रद्द करण्यात आल्यामुळे अनेक लहान वस्त्या आणि तांड्यांच्या स्वतंत्र अस्तित्वाचा मार्ग मोकळा झाला आहे.

याच बदललेल्या निकषांच्या आधारे जिल्ह्यातून विभाजनासाठी एकूण ४२ प्रस्ताव जिल्हा परिषदेमार्फत शासनाकडे पाठवण्यात आले होते, त्यापैकी निकषात बसणाऱ्या ८ प्रस्तावांना अंतिम मंजुरी मिळाली आहे.

नव्याने अस्तित्वात आलेल्या आठ ग्रामपंचायतींमध्ये चाळीसगाव तालुक्यातील सर्वाधिक ५, जामनेर तालुक्यातील २ आणि मुक्ताईनगर तालुक्यातील एका ग्रामपंचायतीचा समावेश आहे. यामध्ये बोरखेडा ग्रामपंचायतीचे विभाजन होऊन बोरखेडासीम, गोद्रीतून सुकानाईक तांडा, देऊळगाव गुजरीतून पळासखेडा काकर, वरखेडे बु. मधून दीपनगर, वलठाणमधून वलठाण तांडा, खेरडेमधून सोनगाव आणि कोंदगावमधून गणपूर अशा नवीन ग्रामपंचायतींची निर्मिती झाली आहे.

जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाचे डेप्युटी सीईओ भाऊसाहेब अकलाडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, शासनाने मान्यता दिलेल्या या नवीन ग्रामपंचायतींवर सध्या प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली आहे. या निर्णयामुळे दुर्गम भागातील तांड्यांच्या विकासाला गती मिळणार असून, केंद्र व राज्य शासनाचा निधी आता थेट या नवीन ग्रामपंचायतींच्या खात्यावर जमा होणार आहे. यामुळे स्थानिक पातळीवर सरपंचांचे अधिकार वाढण्यासोबतच ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळणार आहे.

 

 

 

 


Protected Content

Play sound