Home क्राईम किरकोळ कारणावरून तरुणावर चाकूने प्राणघातक हल्ला ; तिघांवर गुन्हा दाखल

किरकोळ कारणावरून तरुणावर चाकूने प्राणघातक हल्ला ; तिघांवर गुन्हा दाखल


मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मुक्ताईनगर शहरालगत असलेल्या बऱ्हाणपूर रोडवरील आर.टी.ओ. चेक पोस्ट परिसरात एका २५ वर्षीय तरुणावर चाकूने प्राणघातक हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. केवळ भांडण पाहायला गेल्याच्या कारणावरून आरोपींनी तरुणावर हा हल्ला चढवला असून, त्याच्या खिशातील रोख रक्कम देखील हिसकावून घेतली आहे. या प्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी नितीन सुरेश पाटील (वय २५, रा. पिंप्री) हे चेक पोस्टवर लोडिंग-अनलोडिंगचे काम करत असताना ही घटना घडली. ५ एप्रिलच्या रात्री ११.३० वाजेच्या सुमारास एका दुचाकीस्वाराला ट्रकने कट मारल्यावरून वाद सुरू झाला होता. तेथे गर्दी जमलेली पाहून नितीन पाटील हे काय झाले आहे, हे पाहण्यासाठी गेले.

गर्दीत उभे असताना अचानक आरोपी जितेंद्र गजामल पाटील, ललित जगन्नाथ पाटील आणि राहुल विलास गोसावी यांनी नितीनची कॉलर पकडून त्यांना ओढत नेले. आरोपींनी त्यांच्याजवळील धारदार चाकूने नितीनच्या छातीवर दोन्ही बाजूंना वार केले. एवढ्यावरच न थांबता, आरोपींनी नितीनला जमिनीवर पाडून लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. यावेळी जितेंद्र पाटील याने नितीनच्या खिशातील १२०० रुपये काढून घेतले आणि “तू व तुझा मालक जिथे दिसाल तिथे ठार मारू” अशी धमकी दिली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस नाईक राजकुमार चव्हाण करत आहेत.


Protected Content

Play sound