Home क्राईम चोपड्यात पोलिसांच्या सायरनने चोरांची उडाली भंबेरी! शिवकॉलनीत ५ ते ६ चोरट्यांचा घरफोडीचा...

चोपड्यात पोलिसांच्या सायरनने चोरांची उडाली भंबेरी! शिवकॉलनीत ५ ते ६ चोरट्यांचा घरफोडीचा डाव उधळला; थरार CCTV मध्ये कैद

0
4

चोपडा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । चोपडा शहरातील शिवकॉलनी परिसरात घरफोडीच्या उद्देशाने आलेल्या ५ ते ६ संशयित चोरट्यांचा डाव चोपडा शहर पोलिसांच्या सतर्क रात्रगस्तीमुळे उधळला गेला. पहाटेच्या सुमारास बंद घरांची पाहणी करणाऱ्या चोरट्यांना पोलिसांच्या गस्ती वाहनाचा सायरन ऐकू येताच त्यांची एकच धांदल उडाली. पोलिसांना पाहून भिंतीच्या आणि झाडांच्या आडोशाला लपलेल्या चोरट्यांनी पोलिसांचा पाठलाग सुरू होताच अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरून पळ काढला. या संपूर्ण घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवार, १७ नोव्हेंबर रोजी पहाटे २ वाजून ४३ मिनिटांच्या सुमारास पाच ते सहा जणांची संशयित टोळी शिवकॉलनी परिसरात फिरत होती. या संशयितांनी तोंडाला रुमाल बांधले होते. परिसरातील बंद घरांची पाहणी करत संशयास्पद हालचाली सुरू असतानाच रात्रगस्तीवर असलेल्या चोपडा शहर पोलिसांच्या वाहनाचा सायरन वाजला. पोलिसांच्या वाहनाचा आवाज आणि प्रकाशझोत दिसताच चोरट्यांची पळापळ सुरू झाली.

सीसीटीव्ही फुटेजमध्ये संशयित चोरटे पोलिसांचे वाहन जवळ येत असल्याचे लक्षात येताच एका घराच्या भिंतीच्या आणि झाडांच्या आडोशाला लपल्याचे दिसत आहे. काही वेळ तेथेच दबा धरून बसल्यानंतर पोलिसांची चाहूल जवळ येताच त्यांनी तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, पोलिसांनीही तत्काळ हालचाली करत संशयितांचा पाठलाग सुरू केला. मात्र, रात्रीचा अंधार आणि परिसरातील गल्लीबोळांचा फायदा घेत संशयित चोरटे पसार झाले.

विशेष म्हणजे, पोलिसांच्या वेळेवर झालेल्या गस्तीमुळे शिवकॉलनी परिसरातील संभाव्य घरफोडीचा प्रकार टळला. अन्यथा बंद घरांना लक्ष्य करून चोरट्यांनी मोठी चोरी केली असती. पोलिसांच्या सतर्कतेमुळे चोरीचा डाव उधळल्याने परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.

गेल्या काही दिवसांपासून चोपडा शहर पोलिसांनी रात्रीची गस्त अधिक कडक केली आहे. काही दिवसांपूर्वी श्रीकृष्ण कॉलनी परिसरात झालेल्या घरफोडीतील संशयित आरोपीला पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने पकडून दिले होते. या घटनेनंतर आता शिवकॉलनीतही पोलिसांच्या सतर्कतेमुळे चोरट्यांचा प्रयत्न फसला आहे. त्यामुळे पोलिसांच्या रात्रगस्तीचा सकारात्मक परिणाम दिसून येत असल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

दरम्यान, या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती आले असून, त्याच्या आधारे चोपडा शहर पोलीस निरीक्षक पवन देसले यांच्या मार्गदर्शनाखाली संशयित चोरट्यांचा शोध घेण्यात येत आहे. परिसरातील अन्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासून संशयितांची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

चोपडा शहर पोलिसांच्या सतर्क रात्रगस्तीमुळे शिवकॉलनीतील संभाव्य घरफोडी टळली असली, तरी पाच ते सहा संशयित चोरट्यांचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. नागरिकांनीही रात्रीच्या वेळी संशयास्पद हालचाली आढळल्यास तत्काळ पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन करण्यात येत आहे.


Protected Content

Play sound