जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील बोरनार येथे लग्नसमारंभात झालेल्या वादातून २१ वर्षीय प्रेम गोपाल धनगर याचा धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आल्याच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर मयत प्रेमचे नातेवाईक आक्रमक झाले असून, प्रकरणातील सर्व आरोपींना अटक केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली. त्यामुळे जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नातेवाईकांची मोठी गर्दी झाली होती. काही काळ रुग्णालय परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले.
प्रेम गोपाल धनगर हा काही महिन्यांपासून कामानिमित्त अमळनेर येथे राहत होता. दोन दिवसांपूर्वीच तो आपल्या बोरनार या मूळ गावी आला होता. बुधवारी गावातील एका लग्नसमारंभासाठी तो गेला असताना तेथे काही तरुणांसोबत त्याचा वाद झाला. या वादानंतर १५ ते २० जणांच्या टोळक्याने प्रेमला मारहाण केल्याची माहिती समोर आली आहे. याचदरम्यान टोळक्यातील एका व्यक्तीने धारदार शस्त्राने त्याच्यावर वार केला. या हल्ल्यात प्रेम गंभीर जखमी झाला.

घटनेनंतर जखमी प्रेमला तातडीने जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू होण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. अवघ्या २१ वर्षांच्या तरुणाचा अशा प्रकारे मृत्यू झाल्याने धनगर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दरम्यान, लग्नसमारंभात प्रेमचा अन्य एका तरुणासोबत वाद सुरू होता. मात्र, हल्ला करणाऱ्या तरुणांनी प्रेम आपल्यालाच शिवीगाळ करत असल्याचा गैरसमज करून घेतला आणि त्यातून त्याच्यावर हल्ला करण्यात आला, असा दावा नातेवाईकांनी केला आहे. गैरसमजातून झालेल्या या वादाचे रूपांतर गंभीर हल्ल्यात होऊन प्रेमचा जीव गेल्याचा आरोपही नातेवाईकांकडून करण्यात येत आहे.
या घटनेनंतर प्रेमचे नातेवाईक जिल्हा रुग्णालयात मोठ्या संख्येने दाखल झाले. त्यांनी प्रकरणातील सर्व आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी केली. सर्व आरोपींना अटक झाल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा घेतल्याने रुग्णालय परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. यावेळी नातेवाईकांनी पोलिसांकडून ठोस कारवाईची अपेक्षा व्यक्त केली. या प्रकरणी पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पाचही आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मात्र, सर्व आरोपींना अटक झाल्याची पोलिसांची माहिती समोर आल्यानंतरही नातेवाईकांची पुढील भूमिका काय राहणार, याकडे लक्ष लागले आहे. मृतदेह ताब्यात घेण्याबाबतचा निर्णय आणि पुढील कायदेशीर प्रक्रिया याबाबतही उत्सुकता निर्माण झाली आहे.



