जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील एम.आय.डी.सी. परिसरातून दुचाकी चोरी करणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला पोलिसांनी अवघ्या १२ तासांच्या आत अटक केली आहे. साहिल महोमद तडवी (वय २८, रा. मच्छीबाजार, तांबापुरा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, त्याच्याकडून चोरीला गेलेली दुचाकी देखील जप्त करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी अरुण सखाराम अहिरे (३८, रा. तांबापुरा) हे मजुरी करून आपला उदरनिर्वाह करतात. ३ एप्रिल २०२६ रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास त्यांनी आपली ‘हिरो होंडा स्प्लेंडर’ (क्र. MH 28 G 3256) घरासमोर हँडल लॉक करून लावली होती. मात्र, दुसऱ्या दिवशी सकाळी ७ वाजेच्या सुमारास त्यांना आपली दुचाकी चोरीला गेल्याचे लक्षात आले. सर्वत्र शोध घेऊनही गाडी न मिळाल्याने त्यांनी एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.

गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथक तात्काळ रवाना झाले. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली आणि आपल्या गोपनीय खबऱ्यांकडून माहिती मिळवली. मिळालेल्या ठोस माहितीच्या आधारे पोलिसांनी तांबापुरा भागातील साहिल तडवी याला ताब्यात घेतले. त्याची सखोल चौकशी केली असता, त्याने दुचाकी चोरल्याची कबुली दिली.
ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक धनेके, नितीन ठाकूर, किरण पाटील आणि राहुल घेटे यांच्या पथकाने केली.



