बस प्रवासात महिलेच्या गळ्यातील ६५ हजारांची मंगलपोत गायब

धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव ते बाभूळगाव दरम्यान धावणाऱ्या राज्य परिवहन मंडळाच्या बसमध्ये एका ५८ वर्षीय महिलेच्या गळ्यातील सोन्याची मंगलपोत अज्ञात चोरट्याने लांबवल्याची घटना १८ एप्रिल रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास गंगापूर गावाजवळ घडली. याप्रकरणी धरणगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रंजनाबाई शिवाजी सावंत (वय ५८, रा. चमगाव, ता. धरणगाव) यांनी या चोरीची तक्रार नोंदवली आहे. त्या १८ एप्रिल रोजी दुपारी साडेबारा वाजता धरणगाव-बाभूळगाव बसमधून प्रवास करत होत्या. गंगापूर गावाजवळ अज्ञात व्यक्तीने त्यांच्या गळ्यातील अंदाजे ६५ हजार रुपये किंमतीची १८ ग्रॅम वजनाची सोन्याची मंगलपोत अलगदपणे चोरून घेतली.

या घटनेनंतर रंजनाबाई सावंत यांनी धरणगाव पोलीस स्टेशनमध्ये धाव घेऊन तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला असून, पोलीस निरीक्षक पवन देसले यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल प्रदीप पवार या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Protected Content