जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । हरीविठ्ठल नगर परिसरातील मुकुंद नगर सेवा केंद्रात श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त एका भव्य सात दिवसीय अखंड नाम-जप यज्ञ आणि सामूहिक श्रीगुरुचरित्र पारायणाचे आयोजन करण्यात आले आहे. आजपासून सुरू झालेल्या या धार्मिक कार्यक्रमात १५० हून अधिक सेवेकरी सहभागी झाले आहेत.
सप्ताहभर चालणाऱ्या या कार्यक्रमात दररोज सकाळी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीवर आणि भगवान महादेवाच्या शिवलिंगावर षोडशोपचार पूजा होणार आहे. त्यानंतर औदुंबर वृक्षाला प्रदक्षिणा आणि सकाळी ८ वाजता भूपाळी आरती होईल. सकाळी ८:३० वाजता नित्य स्वाहाकार आणि ९:३० वाजता सप्ताहातील विशेष याग आयोजित केले जातील. सकाळी १०:३० वाजता नैवेद्य आरती होईल.
सायंकाळच्या सत्रात, ४ वाजता अब्जचंडी सेवेअंतर्गत श्री दुर्गा सप्तशती, श्री मल्हारी सप्तशती आणि श्री स्वामी चरित्र सारामृत यांचे पाठ होतील. सायंकाळी ६ वाजता औदुंबर प्रदक्षिणा आणि ६:३० वाजता नैवेद्य आरती होईल. सायंकाळी ६:४५ ते ७:१५ या वेळेत नित्य ध्यान, भगवतगीतेचा १५ वा अध्याय, संत तुकारामांचा अभंग आणि विष्णू सहस्रनाम वाचन होईल. यानंतर विविध विषयांवर विशेष मार्गदर्शन केले जाईल.
या सप्ताहाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे अखंड प्रहर सेवा. यात सकाळी ७ ते सायंकाळी ७ पर्यंत महिला सेवेकरी आणि सायंकाळी ७ ते सकाळी ७ पर्यंत पुरुष सेवेकरी प्रहर सेवा देतील. प्रत्येक प्रहरी दोन सेवेकरी विना वाद्याचे नामस्मरण करतील, दोन सेवेकरी जप करतील आणि दोन सेवेकरी श्री स्वामी चरित्र ग्रंथाचे अखंड वाचन करतील.
आज या कार्यक्रमाची सुरुवात मंडल स्थापना, अग्नि स्थापना आणि स्थापित देवतांच्या हवनाने झाली. सप्ताहातील विशेष यागांमध्ये उद्या, २२ एप्रिल रोजी गणेश आणि मनोबोध याग मनाची एकाग्रता आणि कुशाग्र बुद्धीसाठी आयोजित केले जातील. २३ एप्रिल रोजी चंडी याग कुलदेवीची कृपा प्राप्त होण्यासाठी, २४ एप्रिल रोजी स्वामी याग सद्गुरूंची कृपा प्राप्त होण्यासाठी, २५ एप्रिल रोजी रुद्र आणि मल्हारी याग उत्तम आरोग्य आणि कुलदैवताचा आशीर्वाद मिळवण्यासाठी आणि २६ एप्रिल रोजी सत्यदत्त पूजन, बलीपूर्णाहुती आणि सकाळी १०:३० वाजता श्री स्वामी समर्थ महाराज पुण्यतिथीनिमित्त महानैवेद्य आरती करून या सप्ताहाची सांगता होईल. या सर्व धार्मिक उपक्रमांमध्ये अधिकाधिक भाविकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन केंद्र प्रतिनिधी रवींद्र पाटील आणि रेखा सपकाळे यांनी केले आहे.