बंद घरातून दीड लाखांचे दागिने चोरी; अयोध्या नगरातील घटना

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील अयोध्या नगरमधील श्री प्लाझा अपार्टमेंट येथे अज्ञात चोरट्यांनी घरफोडी केल्याची घटना शनिवारी सकाळी ८ ते दुपारी दीड वाजेच्या दरम्यान घडली आहे. चोरट्यांनी बंद घराचे कडीकोंडा तोडून आत प्रवेश करत गोदरेजच्या कपाटातील सुमारे दीड लाख रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केले. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विलास तुकाराम चौधरी (वय ४४, रा. श्री प्लाझा अपार्टमेंट, अयोध्या नगर, जळगाव) यांनी या चोरीची फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, शनिवार १९ एप्रिल रोजी सकाळी ८ वाजेपासून ते दुपारी दीड वाजेपर्यंत त्यांच्या घरी कोणीही नव्हते. याच संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी घराच्या दरवाजाची कडी तोडली आणि कुलूप उघडून घरात प्रवेश केला. घरात प्रवेश केल्यावर चोरट्यांनी गोदरेजच्या कपाटात ठेवलेले सोन्या-चांदीचे दागिने, एक अंगठी आणि तीन चांदीचे बिस्किट असा एकूण १ लाख ५२ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.

दुपारी विलास चौधरी यांचे कुटुंबीय घरी परतल्यानंतर चोरीचा हा प्रकार उघडकीस आला. त्यांनी तात्काळ एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राहुल तायडे करत आहेत.

Protected Content