जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील महावितरणच्या छत्रपती शिवाजीनगर येथील कार्यालयात कर्तव्यावर असताना एका तरुण वायरमनचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुर्दैवी मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना रविवार २० एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास घडली. या घटनेमुळे मयत वायरमनच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, महावितरण कंपनीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये शोककळा पसरली आहे.
मनोज रामू लांडगे (वय ३०, रा. सत्यम पार्क, जळगाव, मूळ टेकाअर्जुने, ता. दिवटी, जि. चंद्रपूर) असे हृदयविकाराच्या झटक्याने प्राण गमावलेल्या तरुण वायरमनचे नाव आहे. मनोज हे जळगावात त्यांच्या आई, वडील, पत्नी आणि एका ४ वर्षांच्या मुलासोबत राहत होते. ते मागील आठ वर्षांपासून महावितरणच्या कार्यालयात वायरमन म्हणून कार्यरत होते.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवार २० एप्रिल रोजी मनोज लांडगे नेहमीप्रमाणे छत्रपती शिवाजीनगर येथील महावितरण कार्यालयात आपल्या सहकाऱ्यांसोबत कर्तव्यावर होते. सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास ते खुर्चीवर बसले असताना अचानक त्यांच्या छातीत तीव्र दुखू लागले. त्यांच्या सहकाऱ्यांनी तात्काळ त्यांना उपचारासाठी शहरातील छत्रपती शाहू महाराज रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्यांची प्रकृती गंभीर असल्याने वैद्यकीय पथकाने त्यांना पुढील उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला.
परंतु, शासकीय रुग्णालयात पोहोचल्यावर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मनोज लांडगे यांना मृत घोषित केले. आपल्या तरुण मुलाचा आणि पतीचा अचानक मृत्यू झाल्याचे समजताच कुटुंबीयांनी रुग्णालयात हृदयद्रावक आक्रोश केला. मनोज लांडगे यांना रुग्णालयात घेऊन आलेल्या महावितरणचे अधिकारी व कर्मचारी तसेच त्यांच्या कुटुंबीयांना या घटनेमुळे मोठा धक्का बसला आहे. एका हसऱ्या-खेळत्या तरुण वायरमनचा अचानक मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. घटनेची माहिती मिळताच अनेक सहकाऱ्यांनी आणि मित्रांनी रुग्णालयात धाव घेतली होती.