भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ शहरातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या जामनेर रोडवरील एटीएम सेंटरमध्ये एका प्रौढ व्यक्तीची मदत करण्याच्या बहाण्याने अज्ञात व्यक्तीने त्यांचे एटीएम कार्ड बदलून घेतले आणि नंतर त्यांच्या खात्यातून ५६ हजार ७११ रुपये काढले. या फसवणुकीप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेतील फिर्यादी संतशरण गुप्ता (वय ६२) हे रेल्वेचे सेवानिवृत्त अभियंता असून ते भुसावळमधील अनिल नगर येथे राहतात. १२ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता ते जामनेर रोडवरील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मुख्य शाखेच्या एटीएम सेंटरमध्ये गेले होते. त्याचवेळी एक अज्ञात व्यक्ती तेथे आली आणि त्याने गुप्ता यांचा विश्वास संपादन केला. मदतीचा बहाणा करत त्या अज्ञात व्यक्तीने चलाखीने संतशरण गुप्ता यांच्याकडील एटीएम कार्ड बदलून घेतले. त्यानंतर या बनावट एटीएम कार्डचा वापर करून वेळोवेळी एकूण सात वेळा मिळून ५६ हजार ७११ रुपये काढले.
आपल्या खात्यातून पैसे काढल्याचा संदेश मिळाल्यानंतर संतशरण गुप्ता यांना फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यांनी तात्काळ भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनमध्ये धाव घेऊन तक्रार नोंदवली. या तक्रारीनुसार, शनिवारी १९ एप्रिल रोजी पहाटे ५ वाजता अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.