हाडांच्या आरोग्य तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; २१५ नागरिकांनी घेतला लाभ

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगावातील विचार वारसा फाउंडेशनने शिवनेरी हॉस्पिटलच्या सहकार्याने आयोजित केलेल्या हाडांचा ठिसूळपणा आणि कमकुवतपणा या विषयावरील भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिराला नागरिकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. या शिबिरात शहरातील तब्बल २१५ नागरिकांनी सहभागी होऊन आपल्या हाडांच्या आरोग्याविषयी महत्त्वपूर्ण माहिती मिळवली आणि तपासणी करून घेतली.

शिबिराच्या सुरुवातीला आरोग्य क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल डॉ. शंतनू भारद्वाज यांचा विचार वारसा फाउंडेशनच्या वतीने विशेष सन्मान करण्यात आला. त्यानंतर शिबिरात उपस्थित असलेल्या सर्व वयोगटातील नागरिकांची कसून तपासणी करण्यात आली. या तपासणीमध्ये प्रामुख्याने हाडांचा ठिसूळपणा (Osteoporosis), हाडांची कमकुवतता, संधिवात (Arthritis), कंबरदुखी, पाठदुखी, सांधेदुखी आणि सतत जाणवणारा थकवा यांसारख्या आजारांविषयी नागरिकांनी तपासणी करून डॉक्टरांकडून मार्गदर्शन घेतले.

शिबिरादरम्यान, तपासणीत आवश्यक आढळलेल्या रुग्णांसाठी मोफत औषधोपचाराची सोय उपलब्ध करून देण्यात आली होती. यासोबतच, काही निवडक नागरिकांची मोफत फुल बॉडी स्कॅन (संपूर्ण शरीर तपासणी) देखील करण्यात आली, ज्यामुळे त्यांना त्यांच्या आरोग्याची अधिक विस्तृत माहिती मिळाली.

याप्रसंगी, हाडांचे आरोग्य दीर्घकाळ निरोगी कसे ठेवावे, याबद्दल डॉ. शंतनू भारद्वाज यांनी उपस्थितांना महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले. त्यांनी संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि हाडांच्या आरोग्यासाठी आवश्यक असलेल्या पोषक तत्वांबद्दल माहिती दिली. विचार वारसा फाउंडेशनचे अध्यक्ष विशाल देशमुख यांनी याप्रसंगी बोलताना सांगितले की, नागरिकांचे आरोग्य निरोगी राहावे यासाठी फाउंडेशनच्या माध्यमातून दर महिन्याला अशा प्रकारचे आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमाला जळगाव शहरातील अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली. यात प्रमुखत्वे नगरसेवक आशुतोष पाटील, अभेद फाउंडेशनच्या अध्यक्षा वैशाली झाल्टे, जगतगुरु महिला बचत गटाच्या अध्यक्षा अलका देशमुख, मंगला मराठे आणि देवका हरणे यांचा समावेश होता. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन तुळजाई फाउंडेशनचे अध्यक्ष भूषण लाडवंजारी यांनी केले. या आरोग्य तपासणी शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी अक्षय गवई, निखिल शेलार, राहुल सोले, संकेत म्हस्कर, प्रफुल सुर्यवंशी, मंगेश मांडोळे आणि मयुर डांगे या कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.

Protected Content