Home Cities जळगाव वाहतूक पोलिसांच्या मनगटावर बांधली प्रेमाची राखी ; जळगावात ‘नारीशक्ती’तर्फे अनोखा रक्षाबंधन सोहळा...

वाहतूक पोलिसांच्या मनगटावर बांधली प्रेमाची राखी ; जळगावात ‘नारीशक्ती’तर्फे अनोखा रक्षाबंधन सोहळा साजरा!

0
8


जळगाव- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । कडक उन्हाची पर्वा न करता आणि धो-धो कोसळणाऱ्या पावसातही रस्त्यावर ठामपणे उभे राहून शहराची वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवणाऱ्या वाहतूक पोलिसांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी जळगाव शहरात एक अत्यंत उपक्रम राबवण्यात आला. ‘नारीशक्ती बहुउद्देशीय संस्था’ जळगावच्या वतीने यंदाचा रक्षाबंधन सण अत्यंत अनोख्या आणि सामाजिक बांधिलकी जपणार्‍या पद्धतीने साजरा करण्यात आला. स्वतःचे घरदार सोडून नागरिकांच्या सेवेसाठी आणि सुरक्षेसाठी अहोरात्र कर्तव्यावर तैनात असणाऱ्या वाहतूक पोलीस कर्मचारी आणि वार्तांकन करणाऱ्या पत्रकार बंधूंना राख्या बांधून त्यांच्या दीर्घायुष्यासाठी व सुरक्षेसाठी प्रार्थना करण्यात आली.

या विशेष कार्यक्रमादरम्यान नारीशक्ती बहुउद्देशीय संस्थेच्या महिला पदाधिकार्‍यांनी शहरातील प्रमुख चौकांमध्ये प्रत्यक्ष जाऊन तेथे कर्तव्यावर असलेल्या वाहतूक पोलिसांना राख्या बांधल्या. सण-उत्सवाच्या काळातही आपली कर्तव्यनिष्ठा न सोडणाऱ्या या पोलिसांच्या चेहऱ्यावर या अनपेक्षित आणि आपुलकीच्या उपक्रमामुळे एक वेगळाच आनंद आणि समाधान पाहायला मिळाले. आपल्या कौटुंबिक वातावरणापासून दूर असलेल्या या कर्मचाऱ्यांना महिलांनी राखी बांधून त्यांच्या सुरक्षेची व आरोग्याची सदिच्छा व्यक्त केली. यासोबतच समाजाचा आरसा मानल्या जाणाऱ्या आणि निडरपणे बातम्या पोहोचवणाऱ्या पत्रकार बांधवांचाही राखी बांधून यथोचित सन्मान करण्यात आला.

या अनोख्या व प्रेरणादायी उपक्रमात नारीशक्ती बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा मनीषा पाटील यांच्या नेतृत्वाखाली संस्थेच्या आशा मौर्य, नेहा जगताप, दिपाली कुलकर्णी, मंगला खडके, वैशाली वाणी आणि पल्लवी सोनवणे आदी महिला पदाधिकारी व सदस्या मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. या उपक्रमातून संस्थेने समाजात एक नवीन पायंडा पाडत, अहोरात्र सेवा देणाऱ्या रक्षकांप्रती आदर व कृतज्ञता व्यक्त केली आहे.


Protected Content

Play sound