Home आरोग्य “दानात दान रक्तदान, रक्तदान हेच श्रेष्ठदान!”; महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराजांचे तरुणांना आवाहन,...

“दानात दान रक्तदान, रक्तदान हेच श्रेष्ठदान!”; महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराजांचे तरुणांना आवाहन, स्वतः रक्तदान करून दिला आदर्श

0
8


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । “रक्तदान हे केवळ दान नसून, एखाद्याच्या जीवनाला नवसंजीवनी देण्याचे महान कार्य आहे. प्रत्येक निरोगी व्यक्तीने दर तीन महिन्यांनी आवर्जून रक्तदान करावे,” असे भावनिक आवाहन फैजपूरचे महामंडलेश्वर पूज्य श्री जनार्दन हरीजी महाराज यांनी केले. स्वतः रक्तदान करून त्यांनी समाजासमोर आदर्श ठेवत तरुणांनी रक्तदानाच्या चळवळीत सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन केले.

बुधवार, दि. २६ ऑगस्ट २०२६ रोजी महामंडलेश्वर पूज्य श्री जनार्दन हरीजी महाराज यांनी जळगाव येथील इंडियन रेड क्रॉस सोसायटीच्या रक्तकेंद्रास भेट देऊन पाहणी केली. यावेळी रक्तकेंद्राचे चेअरमन डॉ. प्रसन्नकुमार रेदासनी यांनी महाराजांचे स्वागत करून रक्तकेंद्रात सुरू असलेल्या अत्याधुनिक रक्त तपासणी आणि रक्तघटक निर्मिती प्रक्रियेची सविस्तर माहिती दिली.

रक्ताची गुणवत्ता आणि सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी रक्तकेंद्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात असल्याचे डॉ. रेदासनी यांनी सांगितले. फोर्थ जनरेशन चाचणी किट्सच्या सहाय्याने केमिल्युमिनिसन्स तंत्रज्ञानाद्वारे रक्त तपासणी केली जाते. त्याचबरोबर NAT (Nucleic Acid Testing) प्रणालीच्या माध्यमातूनही उच्च दर्जाच्या रक्त तपासण्या करण्यात येत असल्याची माहिती त्यांनी महाराजांना दिली. रक्तघटक अधिक सुरक्षितपणे रुग्णांना उपलब्ध करून देण्यासाठी ल्युकोरिडक्शन तंत्रज्ञानाचाही वापर केला जात असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. या प्रक्रियेद्वारे रक्तातील अतिरिक्त पांढऱ्या रक्तपेशी (WBC) कमी केल्या जातात. त्यामुळे आवश्यक रक्तघटकांची गुणवत्ता आणि रुग्णांची सुरक्षितता वाढण्यास मदत होत असल्याचे डॉ. रेदासनी यांनी सांगितले.

दरम्यान, महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांच्या लहानपणापासून मानलेल्या बहिणीची जळगाव येथे शस्त्रक्रिया होणार आहे. तिच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासोबतच शस्त्रक्रियेसाठी आवश्यक रक्त उपलब्ध व्हावे, या भावनेतून महाराजांनी स्वतः रक्तकेंद्रात येऊन रक्तदान केले. महाराजांनी स्वतः रक्तदान करून “स्वतः सुरुवात करा आणि मग इतरांना सांगा” हा संदेश प्रत्यक्ष कृतीतून दिला. समाजातील तरुणांनी रक्तदानाबाबत असलेले गैरसमज दूर करून गरजू रुग्णांच्या मदतीसाठी पुढे यावे, असे आवाहन त्यांनी केले.

“मी स्वतः दर तीन महिन्यांनी रेड क्रॉस रक्तकेंद्रात येऊन रक्तदान करणार आहे,” असा संकल्पही महाराजांनी यावेळी व्यक्त केला. स्वतःच्या कृतीतून रक्तदान चळवळीला सुरुवात करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केल्याने उपस्थितांनी त्यांचे कौतुक केले. रक्तदानामुळे गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध होण्यास मदत होते. त्यामुळे निरोगी आणि पात्र व्यक्तींनी नियमित रक्तदान करून सामाजिक जबाबदारी पार पाडावी, असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. विशेषतः तरुणांनी रक्तदानासाठी पुढाकार घेतल्यास रक्ताची गरज असलेल्या रुग्णांना मोठा आधार मिळू शकतो.


Protected Content

Play sound