Home क्राईम शेतातून परतताना शेतकऱ्यावर काळाचा घाला; भीषण अपघातात दुदैवी मृत्यू

शेतातून परतताना शेतकऱ्यावर काळाचा घाला; भीषण अपघातात दुदैवी मृत्यू

0
203


धरणगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव तालुक्यातील पाळधी ते पथराड गावादरम्यान झालेल्या दुचाकी अपघातात गंभीर जखमी झालेल्या तरुण शेतकऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस स्टेशनमध्ये मृत्यूची प्राथमिक नोंद करण्यात आली आहे.

राकेश श्यामसुंदर चव्हाण (वय ४१, रा. ओमशांती नगर, पिंप्राळा, जळगाव) असे अपघातात प्राण गमावलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. राकेश हे शेती करून आपला उदरनिर्वाह चालवत होते. त्यांची शेती धरणगाव तालुक्यातील अहिरे येथे आहे.

राकेश चव्हाण हे १४ एप्रिल रोजी सकाळी शेतीच्या कामासाठी अहिरे येथे गेले होते. तेथून सायंकाळी ५ ते ६ वाजेच्या सुमारास पथराड ते पाळधी दरम्यान दुचाकीवरून घरी परत येत असताना त्यांचा भीषण अपघात झाला. कुटुंबीयांनी त्यांना तातडीने एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, पाच दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर शनिवारी सकाळी ९ वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या मृत्यूने कुटुंबात मोठा आक्रोश झाला.

अपघाताची माहिती पाळधी पोलीस घेत होते. पुढील कार्यवाहीसाठी राकेश चव्हाण यांचा मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात पाठवण्यात आला. शवविच्छेदनानंतर मृतदेह कुटुंबीयांना सोपवण्यात आला. या घटनेची प्राथमिक नोंद रामानंद नगर पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली असून, या दुर्दैवी घटनेमुळे पिंप्राळा परिसरात शोक पसरला आहे. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगी आणि लहान भाऊ असा परिवार आहे.


Protected Content

Play sound