विद्यूत तारांच्या शॉर्टसर्कीटमुळे मका जळून खाक; शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  धरणगाव तालुक्यातील पिंपळे शिवारात आज दुपारी एक वाजेच्या सुमारास महावितरण कंपनीच्या विद्युत तारांच्या शॉर्टसर्किटमुळे भीषण आग लागली. या आगीत प्रमोद दयाराम पाटील आणि अनिल गोपीचंद पाटील या दोन शेतकऱ्यांच्या मालकीच्या सुमारे तीन एकर जागेतील मका आणि चारा जळून खाक झाला. या आगीमुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
आगीची माहिती मिळताच धरणगाव नगर परिषदेचा अग्निशमन बंब तातडीने घटनास्थळी दाखल झाला. मात्र, आगीची व्याप्ती मोठी असल्याने ग्रामस्थांनीही ट्रॅक्टरच्या मदतीने आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. महावितरणच्या निष्काळजीपणामुळे ही आग लागल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
घटनेची माहिती मिळताच ग्राम महसूल अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन आगीच्या नुकसानीचा पंचनामा केला आहे. या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाल्याने पीडित शेतकरी प्रमोद पाटील आणि अनिल पाटील यांनी शासनाकडे तातडीने पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे. महावितरणच्या भोंगळ कारभारावर शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

Protected Content