जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील डॉ. उल्हास पाटील फिजिओथेरेपी महाविद्यालयात माजी विद्यार्थ्यांच्या स्नेहमेळाव्याचे (ॲल्युमिनी मीट) उत्साहात आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात अनेक वर्षांनंतर एकत्र आलेल्या माजी विद्यार्थ्यांनी त्यांच्या महाविद्यालयीन जीवनातील आठवणींना उजाळा दिला आणि सध्याच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयवंत नगुलकर, प्रशासकीय अधिकारी राहुल गिरी, माजी विद्यार्थी असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. रिजवान खाटीक, उपाध्यक्षा डॉ. कल्याणी नगुलकर, सचिव डॉ. निखिल पाटील यांच्यासह महाविद्यालयातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या मेळाव्यात ४५ हून अधिक माजी विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला.
यावेळी माजी विद्यार्थ्यांनी नवोदित विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासासंबंधी उपयुक्त टिप्स दिल्या. महाविद्यालयात उपलब्ध असलेल्या विविध सोयीसुविधांचा योग्य वापर कसा करावा, तसेच फिजिओथेरेपी क्षेत्रातील भविष्यातील संधी आणि करिअरच्या वाटा यावर मार्गदर्शन केले. माजी विद्यार्थ्यांच्या अनुभवामुळे सध्याच्या विद्यार्थ्यांना निश्चितच प्रेरणा मिळाली.
कार्यक्रमाचे सुंदर संचालन ओजस्वी जनबंधू आणि आस्था पटेल यांनी केले, तर आभार प्रदर्शन शुभम केंद्रे आणि ऋतुजा शारदुल यांनी केले. यानंतर महाविद्यालयाच्या वतीने उपस्थित सर्व माजी विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाच्या शेवटी राष्ट्रगीत गाऊन समारोप करण्यात आला. विशेष म्हणजे, महाविद्यालयाचे संस्थाध्यक्ष आणि माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांनी ऑनलाईन पद्धतीने या कार्यक्रमात सहभाग नोंदवला. त्यांनी माजी विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि त्यांच्या विचारपुस केली, ज्यामुळे माजी विद्यार्थ्यांना अत्यंत आनंद झाला.