


भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । येथील रेल्वेच्या कवाडे नगर परिसरातील जलशुद्धीकरण केंद्र अर्थात फिल्टर हाऊस परिसरात कर्तव्यावर असलेल्या एका रेल्वे कर्मचाऱ्याचा डोक्यात लोखंडी रॉडने वार करून निर्घृण खून करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.
प्रसाद यशवंत कुलकर्णी (वय ५८) असे मृत कर्मचाऱ्याचे नाव आहे. ते रेल्वेच्या फिल्टर हाऊसमध्ये गेल्या दहा वर्षांपासून कार्यरत होते. शनिवारी सायंकाळच्या शिफ्टमध्ये ते कामावर हजर होते. या दरम्यान आकाश भानुदास गोरखा (रा. कवाडे नगर) हा तिथे आला. त्याने फिल्टर हाऊसमध्ये पडलेला लोखंडी रॉड उचलून कुलकर्णी यांच्या डोक्यावर जोरदार प्रहार केला. या भीषण हल्ल्यात कुलकर्णी यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच डीवायएसपी केदार बारबोले, शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक महेश गायकवाड व रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी आरोपी आकाश गोरखा याला काही वेळातच अटक केली.
प्रसाद कुलकर्णी यांच्या अशा अचानक आणि क्रूर खुनामुळे भुसावळ परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. भुसावळ शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत काही दिवसांपूर्वीच खून झाला असतांना शनिवारी रात्री पुन्हा याचीच पुनरावृत्ती झाली आहे. यामुळे परिसरात खळबळ उडाली असून भितीचे वातावरण पसरले आहे.



