अमळनेर लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यातील बोदर्डे परिसरात रविवारी २६ मे रोजी मध्यरात्री दीड ते दोन वाजेच्या सुमारास एका गरीब कुटुंबाच्या झोपडीला अचानक भीषण आग लागली. या दुर्घटनेत काशिनाथ दीलभर भील यांची झोपडी संपूर्णपणे जळून खाक झाली असून, त्यांचा संसार उघड्यावर आला आहे.
या आगीत काशिनाथ भील यांच्या संसारोपयोगी वस्तू, धान्य, कपडे, पैसे, दूरदर्शन संच, तसेच महत्त्वाची कागदपत्रेही जळून भस्मसात झाली. अत्यंत गरीब परिस्थितीत कष्ट करून उदरनिर्वाह करणाऱ्या या कुटुंबावर या आगीमुळे उपासमारीचे संकट आले आहे. सध्या त्यांच्याकडे निवाऱ्यासाठीही काहीच उरलेले नाही.
ग्रामस्थांनी संबंधित प्रशासनाला या दुर्घटनेची तातडीने दखल घेऊन आर्थिक मदत आणि आवश्यक जीवनावश्यक वस्तू पुरवण्याची मागणी केली आहे. स्थानिक नागरिकांनीही या कुटुंबाला मदतीसाठी पुढे यावे, असे आवाहन करण्यात येत आहे.