मनसेचे अनोखे ‘श्रमदान आंदोलन’; महापालिकेचा केला निषेध (व्हिडीओ)


जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील सुप्रीम कॉलनीकडे जाणाऱ्या अपूर्ण रस्त्यावर पडलेल्या मोठ्या खड्ड्यांमुळे वारंवार अपघात होत असल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) एक अनोखे आंदोलन केले. महापालिकेच्या दुर्लक्षित धोरणाचा तीव्र निषेध नोंदवत मनसे पदाधिकाऱ्यांनी स्वतः श्रमदान करत रस्त्यातील खड्डा बुजवला. यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी महापालिकेविरोधात जोरदार घोषणाबाजी करत आपला संताप आणि नाराजी व्यक्त केली.

सुप्रीम कॉलनीचा सुमारे अडीच किलोमीटर लांबीचा रस्ता गेल्या अनेक दिवसांपासून अपूर्ण अवस्थेत आहे. यामुळे या भागातील नागरिकांना आणि वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे केवळ गैरसोयच नाही, तर अपघातांचा धोकाही वाढला आहे. याच मुद्द्यावर प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी मनसेने हे श्रमदान आंदोलन केले.

या आंदोलनादरम्यान, मनसेच्या कार्यकर्त्यांनी “जळगाव महापालिका मुर्दाबाद!”, “कामचुकार अधिकारी हाय हाय!” अशा घोषणा देत प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. या अनोख्या आंदोलनामुळे स्थानिक पातळीवर हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मनसेने केलेल्या या कृतीमुळे तरी महापालिका प्रशासनाला जाग येईल आणि सुप्रीम कॉलनीतील अपूर्ण रस्त्याचे काम तातडीने पूर्ण केले जाईल, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत. अन्यथा, भविष्यात तीव्र आंदोलनाचा इशाराही मनसेने दिला आहे.

व्हिडीओ लिंक :