Home क्राईम जळगावात कोट्यवधींचा गुंतवणूक घोटाळा उघड; गुंतवणूकदारांना २३ कोटींचा गंडा

जळगावात कोट्यवधींचा गुंतवणूक घोटाळा उघड; गुंतवणूकदारांना २३ कोटींचा गंडा


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीवर जादा परतावा देण्याचे आमिष दाखवून २७९ गुंतवणूकदारांची सुमारे २३ कोटी ८१ लाख ७२ हजार ५३० रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी जळगाव आर्थिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणात ‘TWJ असोसिएट्स’चा जळगाव शाखा प्रमुख मिलिंद शालिकराव पाटील (वय ४१) याला अटक करण्यात आली असून, कंपनीच्या मुख्य संचालकांविरुद्धही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

तक्रारदारच निघाला आरोपी :
विशेष म्हणजे, मिलिंद पाटील यानेच सुरुवातीला कंपनीच्या मुख्य संचालकांविरुद्ध तक्रार अर्ज दिला होता. मात्र, पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या आदेशानुसार आर्थिक गुन्हे शाखेने केलेल्या सखोल चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली. मिलिंद पाटील हा स्वतःच या कंपनीचा फ्रेंचायझी म्हणून जळगावमधील कामकाज पाहत होता. गुंतवणूकदारांकडून पैसे स्वीकारून त्यांना करारनामे करून देणे आणि त्याबदल्यात मोठे कमिशन मिळवणे यात त्याचा थेट सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे.

असा झाला घोटाळा :
डिसेंबर २०२० ते सप्टेंबर २०२५ या काळात आरोपींनी संगनमत करून सेमिनारच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची दिशाभूल केली. सेबीच्या (SEBI) नियमांचे उल्लंघन करून ११ महिने मुदतीसाठी गुंतवणूक स्वीकारली, मात्र मुदत संपल्यानंतर परतावा न देता विश्वासघात केला. पाळधी येथील भरत रतीलाल पवार यांच्या फिर्यादीवरून जिल्हापेठ पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता आणि ‘बॅनिंग ऑफ अनरेग्युलेटेड डिपॉझिट स्कीम्स ॲक्ट’नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राज्यात ठिकठिकाणी गुन्हे :
या कंपनीचे मुख्य संचालक समीर सुभाष नार्वेकर आणि नेहा समीर नार्वेकर यांच्यावर पुणे, ठाणे, नवी मुंबई, नागपूर, रत्नागिरी आणि छत्रपती संभाजी नगरसह अनेक ठिकाणी गुन्हे दाखल आहेत. सध्या ते नागपूर पोलिसांच्या ताब्यात असून, लवकरच जळगाव पोलीस त्यांचा ताबा घेणार आहेत.

पोलीसांचे आवाहन :
या घोटाळ्याचा तपास सपोनि गणेश फड व त्यांचे पथक करत आहेत. ज्या गुंतवणूकदारांनी TWJ असोसिएट्सच्या जळगाव शाखेत गुंतवणूक केली आहे, त्यांनी आपली माहिती आर्थिक गुन्हे शाखा, जळगाव येथे द्यावी, असे आवाहन पोलीस उप अधीक्षक यांनी केले आहे.


Protected Content

Play sound