जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव येथे 19 मे रोजी राज्यस्तरीय सहकार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे, ज्यामध्ये नवीन सहकार धोरणावर जिल्ह्यातील सर्व सहकारी संस्थांचा सविस्तर विचार होणार आहे. सहकार भारती जळगाव जिल्हा आणि बळवन्त सहकारी पतसंस्था यांच्या संयुक्त विद्यमाने नियोजन भवनात होणाऱ्या या परिषदेबाबत जिल्हा अध्यक्ष नरेंद्र नारखेडे यांनी माहिती दिली.
केंद्र सरकारने नुकतेच देशभरात नवीन सहकार धोरण राबविण्याचे ठरविले आहे, त्यानुसार महाराष्ट्र सरकारने देखील नवीन सहकार धोरण तयार करण्याचे निश्चित केले आहे. या धोरणासाठी महाराष्ट्रातील अनुभवी व तज्ञ व्यक्तींची समिती नियुक्त करण्यात आली असून, प्रत्येक जिल्ह्यात सविस्तर चर्चा करण्यासाठी सहकार भारती तर्फे चर्चा सत्र आयोजित केले जात आहे.

या परिषदेच्या कार्यक्रमात जळगाव जिल्ह्यातील सहकारी संस्थांचे पदाधिकारी, जिल्हा बँक व इतर सर्व सहकारी बँका, जिल्हा दुधसंघ व दुधसोसायटी, विविध पतसंस्था आणि इतर सहकारी संस्था यांचे चेअरमन व संचालक उपस्थित राहणार आहेत.
परिषदेस प्रमुख मार्गदर्शक म्हणून सतीश मराठे, भारतीय रिझर्व्ह बँक संचालक आणि विवेक जुगाडे, प्रदेश महामंत्री उपस्थित राहणार आहेत. याशिवाय विशेष मान्यवर म्हणून संजय पवार (अध्यक्ष, JDCC बँक), मंगेश चव्हाण (अध्यक्ष, जिल्हा दुध संघ), दिलीप पाटील (राष्ट्रीय संघटन प्रमुख, सहकार भारती), सौ. रेवती ताई शेंदूरणीकर (राष्ट्रीय महिला प्रमुख), रोहित निकम (उपाध्यक्ष, मार्केटिंग फेडरेशन), शशिकांत साळुंखे (अध्यक्ष, पतसंस्था फेडरेशन), सतीश मदाने (अध्यक्ष, जळगाव जनता बँक), गौतम बळसाने (जिल्हा उपनिबंधक), प्रदीप देशमुख (अध्यक्ष, जिल्हा सहकारी बोर्ड), चंद्रहास भाई गुजराथी (बँक असोसिएशन अध्यक्ष), संजय बिर्ला आणि शरद जाधव (संघटन मंत्री) यांची उपस्थिती राहणार आहे.
उपस्थितीचे आवाहन अध्यक्ष नरेंद्र नारखेडे, महानगर अध्यक्ष शोभाताई पाटील, जिल्हा महामंत्री शशिकांत बेहेडे, महानगर महामंत्री प्रमोद नगरकर, बळवन्त सह पतसंस्था चेअरमन राधेश्याम बजाज, व्हा. सविता ताई नाईक, जयदीप शहा आणि सहकार भारती व बळवन्त सहकारी पतसंस्था कार्यकारिणी यांनी केले आहे.



