कळमसरे परिसरात गारपिटीचा तडाखा; शेतीचे मोठे नुकसान !


अमळनेर लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यातील कळमसरेसह निम तांदली, पाडळसरे, शहापूर, वासरे, खेडी, खरदे आदी गावांमध्ये काल (रविवार, २६ मे रोजी) सायंकाळी वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. या अचानक आलेल्या पावसामुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे.

या वादळी पावसामुळे कापणी झालेल्या मका आणि बाजरीच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. विशेषतः निम या गावात १० ते १५ मिनिटे सुपारी आकाराची गारपीट झाल्याने अधिक हानी झाली. निम येथील शेखर गुजर यांच्यासह इतर केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या केळी आणि पपई पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. वादळी वाऱ्याच्या प्रचंड वेगाने काही ठिकाणी वृक्ष उन्मळून पडले आहेत, तर खरदे येथील शेतकरी सर्जेराव पाटील यांच्या शेतातील विहिरीवरील सोलर पॅनल उडून गेल्याची घटनाही घडली आहे.

सध्या अनेक शेतकरी त्यांच्या चारा कुट्टी तसेच मका, बाजरी, भुईमूग पिकांची काढणी करत असताना, अचानक आलेल्या या अवकाळी पावसामुळे त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी शासनाकडे तातडीने या नुकसानीची दखल घेऊन पंचनामे करावेत आणि नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी केली आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी हवालदिल झाले असून, त्यांच्यासमोर मोठे संकट उभे राहिले आहे.