यावल – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर जनावरांमध्ये ताप, गलगोट, तोंडखुरा, लम्पी स्किन यांसारख्या संसर्गजन्य रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता लक्षात घेता, रावेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमोलभाऊ जावळे यांनी पावसाळ्यापूर्वी सर्व जनावरांची आरोग्य तपासणी करून लसीकरण व अन्य प्रतिबंधात्मक उपाययोजना तातडीने राबवण्याचे निर्देश दिले आहेत.
यासंदर्भात त्यांनी जिल्हा पशुवैद्यकीय अधिकारी तसेच तालुका पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना पत्र पाठवून आवश्यक ती कार्यवाही त्वरित करण्याच्या सूचना दिल्या आहेत
या सूचनेनुसार गायी, म्हशी, बकरी, बैल यांसह सर्व जनावरांची वेळेवर आरोग्य तपासणी करण्यात यावी. त्यात संभाव्य रोगांची लक्षणे दिसून आल्यास तत्काळ उपचार करण्यात यावेत. याशिवाय जनावरांचे लसीकरण, जंतनाशक व औषधोपचार, गोठ्यांची स्वच्छता, कीटकनाशक फवारणी आदी उपाययोजना प्रभावीपणे राबवाव्यात, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
“शेतकऱ्यांचे पशुधन हे त्यांच्या उपजीविकेचा आधार आहे. त्यामुळे कोणत्याही रोगाचा फैलाव होऊ नये, यासाठी पशुसंवर्धन विभागाने गावागावात मोहीम राबवून जनजागृती करावी,” असे आवाहन आमदार जावळे यांनी केले. मोहिमेची अंमलबजावणी ग्रामपंचायती, पशुवैद्यकीय कर्मचारी यांच्या समन्वयाने पार पाडावी, असेही निर्देश त्यांनी यावेळी दिले.